रात्री बारानंतर हवेत रसायने सोडण्याचे प्रकार सुरु

 तळोजा वसाहतीत वायू प्रदूषण मोजमाप करणारे स्वयंचलित यंत्र

खारघर : तळोजा औद्योगिक क्षेत्रातून सोडले जाणारे वायू प्रदूषण मोजमाप करणारे स्वयंचलित यंत्र तळोजा फेज -२ वसाहतीत उभारण्यात आल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.

तळोजा एमआयडीसीमधून रात्री बारानंतर हवेत रसायने सोडली जात आहेत. या रसायनांच्या उग्र वासामुळे तळोजा, नावडे, रोडपाली, खारघर परिसरातील नागरिकांची झोपमोड होत आहे. त्याबाबत रहिवाशांनी अनेक वेळा तक्रारी करुनही त्याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जाते, असा आरोप रहिवाशांकडून केला जात आहे.

दरम्यान, प्रदूषण नियंत्रण मंडळ तर्फे नुकतेच तळोजा फेज-२ मधील केदार सोसायटी लगत तळोजा औद्योगिक क्षेत्रातून सोडले जाणारे वायू प्रदूषण मोजमाप करणारे स्वयंचलित यंत्र वाहन उभे करण्यात आले आहे. तळोजा औद्योगिक क्षेत्रातून रात्रीच्या वेळी सोडण्यात येणाऱ्या रसायनांच्या उग्रवासामुळे मळमळ, चक्कर येणे, श्वास घेण्यास अडथळा येणे, असे त्रास रहिवाशांना होत आहेत. गेल्या महिना भरापासून रात्री बारानंतर हवेत रसायने सोडण्याचा प्रकार सुरु आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून उभारण्यात आलेल्या  स्वयंचलित यंत्रा द्वारे मोजमाप करुन प्रदूषण करणाऱ्या कंपनी विरोधात कारवाई करावी, प्रदूषण मोजमाप करणारे यंत्र उभे करुन नागरिकांची दिशाभूल करू नये, असे तळोजा मधील नागरिकांनी सांगितले.

तळोजा वसाहतीत १५ दिवस वायू प्रदूषण मोजमाप करणारे स्वयंचलित यंत्र वाहन उभी करुन दैनंदिन प्रदूषण मोजमाप केले जाणार आहे. - सचिन आडकर, तळोजा विभागीय अधिकारी - प्रदूषण नियंत्रण महामंडळ, नवी मुंबई. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘खाडीवरची माडी' कादंबरी प्रकाशित