कवडीमोल भावाने विकल्या जातात सोन्यासारख्या जमिनी

भरावामुळे चिरनेर गावाला पुराचा वेढा?

उरण ः उरण तालुक्यातील चिरनेर गावाच्या परिसरातील खाडीकिनारी तसेच खाडीच्या बाजूस असलेल्या शेतजमिनीत मोठ्या प्रमाणावर भराव पडल्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चिरनेर गावाला पुराच्या पाण्याचा वेढा बसणार आहे. पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यावर चिरनेर गावात पूर परिस्थिती निर्माण होते. यामुळे चिरनेर गावातील सखल भागात पाणी साचून या भागातील घरे पुराच्या पाण्याने बुडली जातात. त्यामुळे चिरनेर येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. शिवाय येथील नागरिकांच्या जीविताला मोठा धोका संभवत असतो. त्यामुळे पावसाचे चार महिने चिरनेर गावातील नागरिकांना जीव मुठीत धरुन जीवन जगावे लागत आहे.

विकासाच्या नावाखाली बाहेरील खाजगी उद्योजकांनी वाडवडिलांनी राखुन ठेवलेल्या पिढीजात जमिनी शेतकऱ्यांना भुरळ घालून त्यांच्या घशात घालण्याचा सपाटा लावला आहे. त्यासाठी गावागावात दलाल नेमले आहेत. अगदी कवडीमोल भावाने येथील जमिनींची विक्री सुरू असून, बहुतांशी जमिनीवर भराव देखील झाले आहेत. परिणामतः पुढील पिढ्यांचे जीवन सुरळीतपणे जगता यावे, यासाठी खाजगी उद्योजकांना आपल्या सोन्यासारख्या जमिनी कवडीमोल भावाने विकू नका, नाहीतर पुढील पिढ्यांचे जीवन अंधारात येईल, असा सल्ला येथील सुज्ञ शेतकऱ्यांनी दिला आहे.

दरम्यान, चिरनेर येथील शेतकऱ्यांच्या नावाचा सातबारा आता कोरा झाला आहे. त्यामुळे पुढील पिढ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. एखाद्या प्रकल्पाला येथील जमिनी देऊ केल्या, तर येथील शेतकऱ्यांना पैशाबरोबर  नोकऱ्याही  मिळतील आणि पिढीजात शेतीचा सातबारा पिढ्यानपिढ्या जिवंत राहील. चिरनेर परिसरात खाजगी उद्योजकांनी जमिनी खरेदी करण्यासाठी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे पुढील पिढ्यांचे भवितव्य अंधारात आले आहे. भाताचे पीक, वाल, चवळी, कडधान्य पीक देणाऱ्या जमिनी कवडीमोल भावाने विकल्या जात असल्यामुळे येथील पुढील पिढ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. चिरनेर परिसरात गोदामे, वाहतूक कोंडी, प्रदूषण यामुळे येथील नागरिक बेजार झाले असून, विविध प्रकारच्या आजारांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान, सोन्यासारख्या जमिनी खाजगी उद्योजकांना कवडीमोल भावात विकल्या जात असल्यामुळे उद्योजकांचे उखळ पांढरे झाले आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आम्हीही इतर मुलांसोबत उत्तम काम करु शकतो; दिव्यांग मुलांमध्ये आत्मविश्वास