आम्हीही इतर मुलांसोबत उत्तम काम करु शकतो; दिव्यांग मुलांमध्ये आत्मविश्वास

दिव्यांग, सर्वसाधारण मुलांसाठी मुकाभिनय कार्यशाळा संपन्न
 

नवी मुंबई ः माइम अर्थात मुकाभिनय अशी अभिनयातील पायाभूत गोष्ट असून एकही शब्द न उच्चारता कलावंताला आपले म्हणणे केवळ चेह-यावरील हावभाव, शारीरिक हालचालींद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहचवायचे असते. या दृष्टीने सर्वसाधारण मुलांसोबत दिव्यांग मुलांना एकत्र आणून पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या माध्यमातून संकल्प फाऊंडेशन आणि नवी मुंबईतील प्रारंभ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली ८ दिवसीय मुकाभिनय कार्यशाळा अकादमीच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाली. यावेळी मुलांनी सादर केलेल्या ‘बियाँड द साऊंड' या विनोदी मुकाभिनीत दीर्घांकला सुप्रसिध्द नाट्य, चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक विजय पाटकर यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित नाट्यरसिकांनी प्रचंड दाद दिली.

‘नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा'चे नाट्यदिग्दर्शक तथा नाट्यगुरु शिवदास घोडके यांनी या कार्यशाळेत सहभागी मुलांना मुकाभिनयाचे धडे देऊन त्यांच्याकडून दीर्घनाट्य करुन घेतले. यावेळी प्रमुख अतिथी नाट्य अभिनेते विजय पाटकर, ‘विजय शिक्षण संस्था'चे सचिव संजय रहाळकर आणि ‘नॅशनल स्कूलऑफ ड्रामा'चे प्राध्यापक  सुरेश शेट्टी, ‘प्रारंभ फाऊंडेशन'चे विश्वस्त अभय अवसक यांच्या शुभहस्ते शिबिरार्थींना प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. विद्या अवसक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

‘पु. ल. देशपांडे कला अकादमी'चे प्रकल्प संचालक संतोष रोकडे यांनी दिव्यांग मुलांना नजरेसमोर ठेवून राबविलेला सदर अनोखा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष पुढाकार घेतला. सर्वसाधारण मुलांसह दिव्यांग मुलांनी सादर केलेला नाट्याविष्कार एवढा उत्तम रंगला. यातील काही कलावंत दिव्यांग आहेत, तेे सांगितल्यानंतर समजले अशा प्रतिक्रिया विजय पाटकर यांच्यासह अनेकांनी व्यक्त केल्या.

सदर कार्यशाळेत प्रगती कर्णबधीर विद्यालय येथील ८ मुले-मुली सर्वसाधारण मुलांसह सहभागी झाले होते. यानिमित्त आम्हीही इतर मुलांसोबत एकत्र येऊन काही उत्तम करु शकतो, असा आत्मविश्वास दिव्यांग मुलांमध्ये निर्माण झाल्याची प्रचिती आल्याचे कार्यशाळा संचालक शिवदास घोडके यांनी सांगितले. या कार्यशाळेत त्यांना नृत्यगुरु शुभदा वराडकर आणि रंगभूषाकार प्रशांत उजवणे यांनी  कलात्मक सहभाग दर्शवित सहकार्य केले.

भारतीय रंगभूमीचा विचार करता मुकाभिनय अर्थात माइम या कलेचा प्रसार-प्रचार कमी प्रमाणात झालेला दिसून येतो. वास्तविकतः माइम कलाप्रकार अगदी शाळेपासून ते महाविद्यालयीन आणि हौशी रंगभूमीवरील स्पर्धेमध्ये प्रचलित असल्याचे दिसून येते. मात्र, याचे तंत्रशुध्द शिक्षण इच्छा असूनही घेता येत नाही. सदर अडचण लक्षात घेत एनएसडी
पदवीधारक नाट्यगुरु शिवदास घोडके यांनी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, संकल्प फाउंडेशन आणि प्रारंभ फाउंडेशन, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सदर सर्वसमावेशक मुकाभिनय कार्यशाळा घेऊन एक नवे दालन उमलत्या नाट्य कलावंतांसाठी खुले केले. त्यातही विशेषत्वाने दिव्यांग कलावंतांचा समावेश करुन एक उत्तम संदेशही या माध्यमातून दिला आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

रॉयल फाउंडेशन व बांधिलकी प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबिर