‘मानिनी फाऊंडेशन'च्या लढ्यात देशभरातील युवती-महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन

महिलांच्या हक्क, सन्मानासाठी राष्ट्रीय पातळीवर लढा उभारणार -डॉ.भारती चव्हाण  

नवी मुंबई ः लिंग समानते बरोबरच महिलांच्या हक्क आणि सन्मानासाठी देश पातळीवर व्यापक स्वरुपात लढा उभारण्यात येणार असून या लढ्यामध्ये देशभरातील युवती आणि महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ‘मानिनी फाऊंडेशन'च्या अध्यक्ष डॉ. भारती चव्हाण यांनी वाशीमध्ये आयोजित पत्रकार परिषद मध्ये केले.याप्रसंगी डॉ.अरुंधती जोशी, डॉ.निर्मल कासेकर, डॉ.नंदा शिवगुंडे, ॲड.ए.डब्ल्यु अमतु उपस्थित होते.  

देशाच्या विकासात महिलांचे महत्वपूर्ण योगदान आहे. त्यांना आरोग्य सेवा, शिक्षण, मालमत्तेची मालकी, आर्थिक स्थैर्य आणि सुरक्षितता मिळणे आवश्यक आहे. महिला केंद्रित योजनांची योग्य पध्दतीने अंमलबजावणी केल्यास त्या अधिक आत्मविश्वासू, स्वावलंबी, ज्ञानी, स्वाभिमानी बनतील. ज्यामुळे देशाच्या जीडीपी मध्ये आणि आनंद निर्देशांकातही वाढ होईल. तसेच कौशल्य विकास निर्मिती शिक्षण कार्यक्रमांद्वारे युवती आणि महिलांच्या क्षमतेत, निरक्षरता निर्मुलनासाठी मदत होईल, असे डॉ.भारती चव्हाण यांनी यावेळी सांगितले.  

भारतीय संस्कृतीमध्ये मातेचा मातृ देवो भव म्हणून सन्मान केला जातो. प्रत्येक माता तिच्या कुटुंबाची निःपक्षपणे, जबाबदारीने आणि निःस्वार्थपणे समर्पण भावनेने काळजी घेत असते. माता आदर, उपासना, सन्मान आणि भक्तीला पात्र आहे. त्यामुळे मुलाच्या जन्मापासूनच आईच्या हक्कांचे रक्षण केले पाहिजे. तिचे नाव प्रत्येक दस्तऐवजीकरणात सन्मानाने नोंदले पाहिजे. त्यासाठी प्रत्येक बाळाच्या जन्मप्रमाणपत्रात आईचे नांव, वडिलांचे नांव आणि आडनाव दर्शविलेले असावे, अशी मागणी ‘मानिनी फाऊंडेशन'तर्फे करण्यात आल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.  

शाळा, महाविद्यालय, संस्था, नोकरीचे अर्ज, अन्य सर्व प्रकारचे दस्ताऐवज यामध्ये प्रथम प्राधान्य आईच्या नावाला दिले पाहिजे. त्यानंतर वडिलांचे नांव आणि आडनाव असावे. यामुळे समाजात आईची ओळख आणि तिला सन्मान प्राप्त होईल. परिणामी, महिलांकडे बघण्याचा कुटुंबाचा आणि समाजाचा दृष्टीकोन बदलेल यासाठी केंद्र सरकारने आगामी अधिवेशनात याबाबतचा कायदा संमत करावा, अशीही मागणीही करण्यात आल्याचे डॉ. भारती चव्हाण यांनी यावेळी म्हणाल्या.

प्रत्येक बाळाच्या जन्मानंतरच्या तसेच पुढील सर्व दस्ताऐवज मध्ये मुलाचे पूर्ण नांव, आईचे नांव, वडिलांचे नांव आणि आडनाव अशा क्रमाने लिहावे. मुलाच्या नावासाठी तीन कलम ऐवजी चार कॉलम असावेत. मातेचे नाव जन्मापासून लिहिण्याचा कायदा संमत झाल्यास महिलेचे नांव जन्मदाखल्यापासून कागदोपत्री येईल. स्वाभाविकच मालमत्तेच्या उताऱ्यावर वडिलांच्या नावाबरोबर आईचे नांव लागेल. तिचा मालकी हक्क अधिकृत झाल्यामुळे अत्याचाराचे प्रमाण कमी होईल. आर्थिक सक्षमता येऊन आत्मविश्वास वाढीस लागेल. परावलंबित्व कमी होऊन कौटुंबिक सुरक्षा, सामाजिक सुरक्षा वाढीस लागेल, असा विश्वास डॉ.भारती चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.  

दरम्यान, सदर लढ्यात सर्व महिलांनी आणि सामाजिक संस्थांनी पुढे येवून सहभाग घ्यावा. यासाठी खाली नमूद केलेल्या सोशल मीडियाच्या लिंक द्वारे संपर्कात राहण्याचे आवाहन देखील डॉ. भारती चव्हाण यांनी केले आहे.  

मानिनी फाऊंडेशन एक स्वयंसेवी संस्था असून या संस्थेने महिला सक्षमीकरण आणि महिला कामगार हक्कांवर लक्ष केंद्रित केले आहे. महिला सक्षमीकरण ‘मानिनी फाऊंडेशन'चे ब्रीदवाक्य असून महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांना संघटीत करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. ‘मानिनी फाऊंडेशन'च्या वतीने महिलांना आर्थिक, मानसिक, शारीरिक, सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच विविध उपक्रम राबवून त्यांना स्वावलंबी बनवले जात आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वडघर व करंजाडे येथील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त !