शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
डॉ. नितीन बळवल्ली यांच्या पुस्तकाचा लोकार्पण समारंभ संपन्न
‘स्कँडिनेव्हियाची नजरभेट'चे वाशीमध्ये प्रकाशन
नवी मुंबई ः वाशी येथील नामवंत शल्य विशारद डॉक्टर नितीन बळवल्ली यांनी लिहिलेल्या ‘स्कँडिनेव्हियाची नजरभेट' या पुस्तकाचा लोकार्पण सोहळा १४ मे रोजी वाशीच्या मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळाच्या सभागृहात पार पडला. प्रवासात ज्या स्थळांना भेटी देतो त्या स्थळांची पार्श्वभूमी, इतिहास, कालखंड इ. तपशीलवार वर्णन याबरोबरच लेखकाची जीवनदृष्टी, सौंदर्यदृष्टी, निरिक्षणकला, कल्पनाशक्ती याबरोबरच ओघवती, समर्पक भाषाशैली असेल तर ते एक सुंदर ललितरम्य प्रवासवर्णन ठरेल अशा शब्दांत कार्यक्रमाचे प्रमुख ववते डॉ अजित मगदूम यांनी उत्तम प्रवासवर्णनाची वैशिष्ट्ये सांगितली व मराठी साहित्यातील उत्तम प्रवासवर्णनांचा आढावा घेतला.
डॉ. बळवल्ली यांचे शालेय जीवनापासूनचे मित्र कवी नितीन तेंडुलकर यांनी आपल्या खुसखुशीत शैलीत मैत्रीच्या अनेक गमतीदार आठवणींना याप्रसंगी उजाळा देत डॉ बळवल्लींच्या लेखन कलेचं भरभरून कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या. डॉ नितीन बळवल्ली यांनी आपल्या मनोगतात लोकप्रिय टूर डेस्टिनेशनला फाटा देऊन वेगळा प्रांत कसा निवडला, हे सांगत चित्रफितीद्वारे स्कँडिनेव्हियन देशांतील निसर्गसौंदर्य आणि वैशिष्ट्ये ओघवत्या शब्दात विषद केली. मुखपृष्ठकार तरुण वास्तुविशारद राजीव मळगी आणि मलपृष्ठकार स्मृती बळवल्ली यांचा याप्रसंगी यथोचित सत्कार करण्यात आला. सृजन संवाद प्रकाशनचे युवा प्रकाशक आणि कवी गितेश शिंदे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळाचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. डॉ मृण्मयी भजक यांनी नेटके सूत्रसंचालन केले. प्रसंगी कवी साहेबराव ठाणगे, आप्पा ठाकूर, अशोक गुप्ते, डॉ अशोक पाटील यांच्यासह मुंबई, नवी मुंबई ठाणे परिसरातील वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर, मित्रमंडळी यांची सभागृहात उपस्थिती होती.