जलसंपन्न नवी मुंबई शहरामधील खेदजनक प्रकार

पावणे मधील आदिवासींच्या घशाला कोरड

वाशी ः पावणे एमआयडीसी परिसरातील आदिवासी पाड्यातील नागरिकांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करत दीड किलो मीटरची पायपीट करावी लागत आहे. मागील पाच ते सहा महिन्यांपासून हंडाभर पाण्यासाठी रात्रभर जागरण केले तरच पाणी; अन्यथा रिकाम्या भांड्यांचे दर्शन घडले जाते. या परिसरात मध्यरात्री २ वाजता पाणी येते ते सकाळी ६ वाजेपर्यंत, त्यानंतर पाणीच नाही. त्यामुळे दिवसभरासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी दीड किलोमीटरची पायपीट येथील आदिवासी बांधवांसाठी नित्यक्रम झाला आहे.
‘वाल्मिकी आवास योजना'मधून पावणे गावातील वारली पाडा येथील आदिवासींना महापालिकेने घरे बांधून दिली आहेत. सहा ते सात वर्षांपूर्वी येथील कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. मात्र, सदर ठिकाणी पाण्याची टाकी असून प्रत्येकाच्या घराघरात नळजोडणी देण्यात आलेली आहे. पण, टाकीत पाणीच नसल्याने पाईपलाईन गंजू लागल्या आहेत. ज्यावेळी आदिवासी कुटुंबाचे वारली पाडा येथे स्थलांतरण करण्यात आले, त्यावेळी काही दिवस टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता तो देखील घरगुती वापरासाठी. मात्र, कालांतराने या ठिकाणी पाण्याची व्यवस्था बंद पडली. त्यामुळे पिण्याचे पाणी लागल्यास ते जुन्या वारली पाड्यातून आणावे लागते  होते.

सदरचा दिनक्रम काही दिवसांचा नसून गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. आजही पिण्याच्या पाण्यासाठी जुन्या वारली पाड्यावर नाहीतर दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या शालिमार कंपनी जवळ फुटलेल्या जलवाहिनीचा आधार या आदिवासी बांधवांना घ्यावा लागत आहे. येथील पाण्याची टंचाई जास्त असल्याने लहान मुलांना देखील पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे स्वतःचे मोरबे धरण असलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील आदिवासी नागरिकांवर पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे. आदिवासी महिला आणि पुरुष मंडळीना नोकरी धंदा सांभाळून पाणी भरावे लागत असल्याने रात्री जागरण आणि दिवसा काम त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर देखील याचा परिणाम जाणवत आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 डॉ. नितीन बळवल्ली यांच्या पुस्तकाचा लोकार्पण समारंभ संपन्न