आयुक्त नार्वेकर यांच्याकडून कारणे दाखवा नोटीस

 महापालिका उपायुवत पटनिगिरे यांच्या अडचणीत वाढ

नवी मुंबई ः केलेली बदली रद्द करण्यासाठी वरिष्ठांनी पाच लाखाची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणारा महापालिकेचा कनिष्ठ अभियंता रितेश पुरव याची सक्षम प्राधिकारी असलेल्या महापालिका आयुक्तांच्या अधिकाराचा दुरुपयोग करुन त्यांच्या पूर्व परवानगीशिवाय परस्पर बदली करणारे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अमरीश पटनिगीरे यांना अखेर महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

उपायुक्त अमरीश पटनिगीरे यांचे सदरील वर्तन कार्यालयीन शिस्तीत धरुन नसून त्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) १९७९ मधील नियम क्रमांक-३चा भंग केला आहे. तुमच्या या गैरवर्तनाकरिता तुमच्याविरुध्द शिस्तभंगाची कार्यवाही का प्रस्तावित करण्यात येऊ नये? याचा खुलासा महापालिका आयुक्तांकडे तीन दिवसात सादर करण्याचे सदर नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. आयुक्तांनी बजावलेल्या सदर नोटीसमुळे अमरीश पटनिगीरे यांच्या अडचणीत वाढ झाली असल्याचे बोलले जात आहे.

बदली रद्द करण्यासाठी कनिष्ठ अभियंता कडून पाच लाखाची लाच स्वीकारण्याचे प्रकरण सध्या नवी मुंबई महापालिकेत चर्चेचा विषय ठरले आहे. या प्रकरणाचे पडसाद अजुनही नवी मुंबई महापालिकेत उमटत आहेत. महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांची बदली-पदस्थापना (जबाबदारी) देण्याचे अधिकार सक्षम प्राधिकारी म्हणून आयुक्तांचे आहेत. महापालिकेच्या शहर अभियंता विभागात कार्यरत असलेले कनिष्ठ अभियंता रितेश पुरव यांची २ जुलै २०२१ मध्ये महापालिकेच्या बी-नेरुळ विभाग कार्यालयात (अतिक्रमण विभागात) आयुक्तांच्या आदेशानुसार बदली करण्यात आली होती. परंतु, बदलीचे कोणतेही अधिकार नसताना अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अमरीश पटनिगीरे यांनी २४
एप्रिल रोजी कनिष्ठ अभियंता रितेश पुरव यांची बी-विभाग कार्यालय नेरुळ येथून मुख्यालयातील अतिक्रमण विभाग कार्यालयात रिक्त असलेल्या कनिष्ठ अभियंता पदावर मुख्यालय स्तरावरील कामकाज सांभाळण्यासाठी नियुक्ती केली होती. त्यामुळे उपायुक्तांनी केलेली सदर बदली रद्द करण्यासाठी रितेश पुरव यांच्याकडे वरिष्ठांकरिता पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी लिपीक दिनेश सोनवणे यांच्यामार्फत करण्यात आली होती. वरिष्ठांकरिता सदर लाच स्वीकारताना परिमंडळ-२ कोपरखैरणे येथील लिपीक दिनेश सोनवणे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले होते.

महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदलीबाबत आयुक्तांना असलेल्या अधिकाराचा दुरुपयोग करुन अमरीश पटनिगीरे यांनी रितेश पुरव यांना मुख्यालयातील अतिक्रमण विभागात रिक्त असलेल्या कनिष्ठ अभियंता पदाचा कार्यभार सोपवल्याने सक्षम प्राधिकारी असलेल्या आयुक्तांच्या २ जुलै २०२१ रोजी बदली आदेशांतील निर्देशाचे उल्लंघन झाल्याचा ठपका प्रशासनाने पटनिगीरे यांच्यावर ठेवला आहे. सदर प्रकरणामुळे अमरीश पटनिगीरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी कनिष्ठ अभियंता रितेश पुरव यांची मुख्यालयातील अतिक्रमण विभागातून मोरबे धरण येथे कनिष्ठ अभियंता म्हणून बदली केली आहे. तर बदली प्रकरणात वरिष्ठांकरिता पाच लाख रुपये लाच रुपये स्वीकारणारा परिमंडळ-२ कोपरखैरणे येथील लिपीक दिनेश सोनवणे याला महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी निलंबित केले आहे. विशेष म्हणजे लाच स्वीकारणारा आरोपी दिनेश सोनवणे ४८ तास देखील तुरुंगात नसताना आणि सध्या तो जामिनावर बाहेर असतानाही प्रशासनाने त्यास निलंबित केले आहे.

दरम्यान, उपायुक्त अमरीश पटनिगीरे यांच्यावर लाच प्रकरणात महापालिका प्रशासन कारवाई करते की नाही? याकडे अधिकारी-कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘पनवेल हॉकर्स फेडरेशन'तर्फे महापालिका आयुवतांना निवेदन