पेंधर, पेठाली मेट्रो स्थानक समोरील गटारावरील झाकण गायब

तळोजा येथील पेंधर आणि पेठाली मेट्रो रेल्वे स्थानक समोर असलेल्या पदपथावरील गटाराचे झाकण गायब

खारघर ः तळोजा येथील पेंधर आणि पेठाली मेट्रो रेल्वे स्थानक समोर असलेल्या पदपथावरील गटाराचे झाकण गायब झाले असल्याने नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. ‘सिडको'ने सदर गटारावर झाकण लावावे, अशी मागणी पेंधर आणि पेठाली मधील नागरिकांकडून केली जात आहे.

तळोजा वसाहत फेज एक आणि दोन परिसरात ‘सिडको'ने रस्त्यालगत पावसाळी पाणी वाहून नेणारी गटारे बांधून त्यावर पदपथ उभारला आहे. मात्र, बहुतांश गटारावरील झाकणे गायब झाली आहेत.

दरम्यान, ‘सिडको'ने उभारलेल्या तळोजा येथील पेंधर आणि पेठाली मेट्रो स्टेशन समोर असलेल्या पदपथावरील गटाराचे झाकण गायब झाले असल्याने नागरिकांसाठी सदर रस्ता धोकादायक झाला आहे. येत्या काही दिवसात नवी मुंबई मेट्रो रेल्वे सुरु होण्याच्या मार्गावर आहे. विशेष म्हणजे पेंधर मेट्रो रेल्वे स्थानक तळोजा फेज-दोनच्या मध्यभागी असून, स्थानकाच्या खाली रस्ता आहे. त्यामुळे तळोजा फेज-दोन परिसरातील नागरिक, महिला, मुले-मुली यांची या ठिकाणी मोठया प्रमाणात वर्दळ असते.

‘सिडको'ने पेठाली मेट्रो रेल्वे स्थानक परिसरात वाहनतळ उभारण्याचे काम काही दिवसापूर्वी केले आहे. मात्र, पेठाली मेट्रो रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या पदपथावरील गटारावर झाकण नाही. त्यामुळे नागरिकांसाठी पेठाली मेट्रो रेल्वे स्थानकासमोरील पदपथ धोकादायक ठरत असून, ‘सिडको'ने उघड्या गटारावर झाकण लावावे, अशी मागणी तळोजा मधील नागरिकांकडून केली जात आहे.

पेठाली मेट्रो रेल्वे स्थानक कडून सेक्टर-१४ मार्गे सेक्टर-७ मधील पॅराडाईस इमारत कडून भोईरपाडा आणि पेठाली गावकडून ‘मेट्रो कार शेड'कडे जाणाऱ्या रस्त्यावर सकाळी मोठ्या संख्येने नागरिक मॉर्निग वॉक करण्यासाठी येत असतात. मात्र, सदर रस्त्यालगत असलेल्या पदपथावरील झाकण गायब झाले आहे. उन्हाळी सुट्टीमुळे सध्या मुले रस्त्यावर खेळत असतात. त्यामुळे गटारात पडून अपघात होण्याची शक्यता असून, पनवेल महापालिकेने सदर गटारावरील झाकण लावावे, अशी मागणी पेठाली मेट्रो रेल्वे स्थानक परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

सिडको प्रशासन दरवर्षी निविदा काढून गटारावर झाकणे बसविण्याचे काम करीत होते. मात्र, तळोजा, खारघर नोड आता पनवेल महापालिकाकडे हस्तांतरीत झाल्याने महापालिकेने पावसाळा सुरु होण्यापूर्वी गटारावर झाकण बसविण्याची गरज आहे. - प्रल्हाद केणी, पदाधिकारी - भाजप.

तळोजा परिसरातील उघड्या गटारांची पाहणी करुन गटारावर झाकणे बसविली जातील. पेंधर आणि पेठाली मेट्रो रेल्वे स्थानक परिसरात सिडकोकडून कामकाज केले जात आहे. झाकण नसलेल्या उघड्या गटारांविषयी सिडको अधिकाऱ्याशी संपर्क केला जाणार आहे. - जितेंद्र मढवी, खारघर प्रभाग अधिकारी - पनवेल महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

४५ महिला आणि पुरुष पत्रकारांची आरोग्य चाचणी