‘उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ'तर्फे बावीस्कर यांचा गौरव

प्रकाश बावीस्कर यांना खान्देश उद्योगरत्न पुरस्कार

नवी मुंबई ः ‘उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ'तर्फे आयोजित खान्देश महोत्सव अत्यंत दिमाखदार आणि दैदिप्यमान स्वरुपात कल्याण येथे संपन्न झाला. यावेळी ‘कल्याण'चे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते मानाचा खान्देश उद्योगरत्न पुरस्कार बांधकाम व्यावसायिक तथा चित्रपट निर्माता प्रकाश बावीस्कर यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ‘उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ'चे अध्यक्ष विकास पाटील, अंबरनाथ नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, आदि उपस्थित होते. दरम्यान, सदर सोहळ्यात खान्देश सुपुत्र ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांना खान्देश भूषण पुरस्कार तर महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभागाच्या सचिव सौ. मिनाक्षी पाटील यांचा विशेष खान्देश पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रकाश बावीस्कर नवी मुंबईतील प्रसिध्द विकासक असून ते  गेल्या २० वर्षापेक्षा जास्त काळापासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. खान्देशातील छोट्या खेड्यातून मुंबईला येऊन स्वतःच्या कर्तृत्वाने आणि जिद्दीने बांधकाम क्षेत्रात एक यशस्वी व्यावसायिक म्हणून त्यांनी आपले नाव कमावले आहे. व्यवसायाबरोबर सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी आजपर्यंत अनेक सदनिका स्वस्त दर घर योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना उपलब्ध करुन दिलेली आहेत. नवी मुंबई महापालिका कर्मचारी युनियन नेते असताना बावीस्कर यांनी आंदोलनात्मक पध्दतीने कामगारांच्या अनेक समस्या सोडविल्या आहेत. सद्यस्थितीत नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलचे प्रकाश बावीस्कर महाराष्ट्र कमिटी मेंबर आहेत. महारेरा ते कॉन्सिलीटर /सल्लागार म्हणून नियुक्त आहेत. याशिवाय ‘मराठी बांधकाम व्यावसायिक महासंघ'चे संस्थापकीय महासचिव आणि ‘नवी मुंबई क्रेडाई-एमसीएचआय'चे माजी अध्यक्ष आणि चेअरमन म्हणून बावीस्कर यांनी कामकाज केले आहे. तर सद्यस्थितीत या संस्थेवर सचिव म्हणून कार्यरत आहेत. नवी मुंबई एअरपोर्ट परिसरात सोयीसुविधा देण्याकरता विकास प्राधिकरण व्हावे याबाबत त्यांनी मे २०११ रोजी तत्कालीनमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मागणी केली होती.

दरम्यान, मराठी तरुणाांना व्यवसायाकडे वाटचाल करण्याकरिता प्रोत्साहन देणारा आणि संघर्षातून यश कसे प्राप्त करता येते याचे मार्गदर्शन करण्यासाठी ‘मराठी पाऊल पडते पुढे'या चित्रपटाची प्रकाश बावीस्कर यांनी निर्मिती केली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पेंधर, पेठाली मेट्रो स्थानक समोरील गटारावरील झाकण गायब