८० लाखांच्या वैद्यकीय सामुग्रीचे पनवेल महापालिकेकडे विनामुल्य हस्तांतरण

कळंबोली कोव्हीड केंद्रातील ऑविसजन साठवण टाक्यांसह ऑक्सिजन सिलेंडरचा समावेश

नवी मुंबई ः ‘सिडको'तर्फे कळंबोली येथे उभारण्यात आलेल्या समर्पित कोव्हीड आरोग्य केंद्रातील (डीसीएचसी) २ व्हेपोरायझरसह असलेल्या अनुक्रमे ३० किलोलीटर आणि १० किलोलीटरच्या द्रवरुप ऑक्सिजनच्या साठवण टाक्या (एलएमओ), एका व्हेपोरयझरसह २४० लिटरच्या द्रवरुप वैद्यकीय ऑक्सिजनचे १० सिलेंडर (डुरा) आणि ४६.७० लिटरचे (जम्बो) वैद्यकीय ऑक्सिजनचे ४८ सिलेंडर पनवेल महापालिकेला विनामुल्य हस्तांतरीत करण्याचा निर्णय ‘सिडको'ने घेतला आहे.

महाराष्ट्र शासनाने २०२१ मध्ये कोव्हीडच्या दुसऱ्या लाटे दरम्यान अधिकाधिक रुग्णांवर उपचार करता यावेत याकरिता मुंबई महानगर प्रदेशात समर्पित कोव्हीड आरोग्य केंद्रांची उभारणी करण्याचे निर्देश ‘सिडको'ला दिले होते. त्यानुसार ‘सिडको'ने अल्प कालावधीतच मुंबईतील कांजूरमार्ग, मुलुंड यासह नवी मुंबईत कळंबोली येथील कॉटन कॉर्पोरेशनच्या गोदामामध्ये कोव्हीड आरोग्य केंद्राची उभारणी केली. कळंबोली येथील ६३५ खाटांच्या या आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय साधने, सीसीटीव्ही यंत्रणा, पीए सिस्टीम, आयटी, अग्निशमन यंत्रणा, ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजनच्या साठवणीसाठी टाक्या आदि सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. या केंद्राच्या उभारणीसाठी ‘सिडको'ला सल्लागार शुल्कासह २९.७९ कोटी रुपये इतका खर्च आला होता.

पनवेल महापालिकेला सदर केंद्रांचे हस्तांतरण केल्यानंतर ८ ऑक्टोबर २०२१ रोजी या केंद्राचे उद्‌घाटन होऊन पनवेल महापालिकेकडून या केंद्राचे परिचालन करण्यास सुरुवात झाली. कोव्हीड रुग्णांच्या संख्येत सातत्यपूर्ण घट झाल्यानंतर ९ फेब्रुवारी २०२३ रोजी सदर केंद्र पनवेल महापालिकेकडून बंद करण्यात आले. यानंतर या कोव्हीड आरोग्य केंद्रातील नमूद सुमारे ८० लाखांच्या वैद्यकीय सामुग्रीचे पनवेल महापालिकेला विनामुल्य हस्तांतरण करण्याचा निर्णय ‘सिडको'तर्फे घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार कोव्हीड पॅनडेमिकच्या कठीण काळात ‘सिडको'ने मुंबई महानगर प्रदेशातील वैद्यकीय गरजांची पूर्तता केली होती. नागरिकांना उत्तम पायाभूत सुविधा पुरवण्यासोबतच त्यांचे आरोग्य देखील उत्तम राहिल यादृष्टीने सिडको महामंडळ नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. या निर्णयामुळे पनवेल महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक आरोग्य सुविधा अधिक सक्षम होतील. -डॉ. संजय मुखर्जी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ'तर्फे बावीस्कर यांचा गौरव