ठाणे जिल्हाधिकाऱ्यांची महापालिकेला परवानगी

नेरुळ मधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा मार्ग मोकळा

वाशी ः नवी मुंबई महापालिका तर्फे नेरुळ सेक्टर-१ मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांचा सिंहासनारूढ पुतळा उभारण्यासाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांची नवी मुंबई महापालिका प्रशासनाला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे लवकरच या चौकात शिवरायांचा पुतळा प्रत्यक्षात स्थापित होणार आहे. सदर ठिकाणी पुतळा बसवावा याकरिता ‘काशी कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट'चे अध्यक्ष देवनाथ म्हात्रे  यांनी नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.

एकविसाव्या शतकातील शहर म्हणून आज नवी मुंबई शहराची ओळख आहे. त्यामुळे आधुनिक नवी मुंबई शहराला ऐतिहासिक वारसा देखील लाभला पाहिजे, आगामी पिढीला इतिहासाची महिती अधिक मिळावी, याच उद्देशाने नवी मुंबई शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिल्प, पुतळे बसविण्याची गरज होती. नेरुळ सेक्टर-१ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने चौक आहे. मात्र, या चौकात शिवाजी महाराज यांचा पुतळा नव्हता ना कुठली तसवीर. त्यामुळे याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवावा, अशी मागणी ‘काशी कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट'चे अध्यक्ष देवनांथ म्हात्रे यांनी नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडे सातत्याने लावून धरली होती. मात्र, सदर ठिकाणी पुतळा बसवण्यासाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक होती. आता, ती परवानगी नवी मुंबई महापालिका प्रशासनाला प्राप्त झाली असून, लवकरच  नेरुळ सेक्टर-१ मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी शिवरायांचा सिंहासनारुढ पुतळा स्थापित केला जाणार आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

खारघर मधील नागरिक समाधानी