महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांचा तडकाफडकी निर्णय

महापालिका मध्ये उपायुवतांचे खाते बदल

नवी मुंबई ः महापालिकेच्या परवाना विभाग आणि अतिक्रमण विभागात सुरु असलेल्या सावळ्या गोंधळामुळे अखेर नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी ८ उपायुक्तांच्या खात्यांतर्गत बदल केला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण आणि परवाना विभागात मोठ्या प्रमाणात अनागोंदी होत असल्याच्या तक्रारींमुळे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अमरीश पटनिगीरे यांच्याकडील सदर खाते काढून त्या खात्याचा अतिरिक्त कार्यभार परिमंडळ-१चे उपायुक्त सोमनाथ पोटरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तर परवाना विभागाचे उपायुक्त डॉ. श्रीराम पवार यांच्याकडील सदर खाते काढून त्या खात्याचा अतिरिक्त कार्यभार सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त नितीन नार्वेकर यांच्याकडे देण्यात आला आहे.


त्याचबरोबर नवी मुंबई महापालिकेत नुकतेच प्रतिनियुक्तीवर आलेले उपायुक्त दिलीप नेरकर यांच्याकडे उद्यान आणि वृक्ष प्राधिकरण विभागाचा मूळ कार्यभार सोपविण्यात आला असून त्यांच्याकडे विधी विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. यापूर्वी उद्यान विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपायुक्त नितीन नार्वेकर यांच्याकडे होता. तर घनकचरा विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्याकडे स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्ष, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि सुरक्षा विभागाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.

याशिवाय परिवहन विभागाचे महाव्यवस्थापक योगेश कडुस्कर यांच्याकडे असलेला शिक्षण विभागाचा अतिरिक्त कार्यभार काढून तो उपायुक्त अनंत जाधव यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तर उपायुक्त मंगला माळवे यांच्याडील खाती तशीच ठेवण्यात आली आहेत.

उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांचे खातेपालट करताना महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने आणि सार्वजनिक सेवेच्या हितार्थ सदर खातेपालट करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. असे असले तरी महापालिका अधिकारी, कर्मचारी यांना शिस्त लावण्याचा त्यामागे उद्देश असल्याचे बोलले जात आहे.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ठाणे जिल्हाधिकाऱ्यांची महापालिकेला परवानगी