पावसाळयाच्या तोंडावर अनधिकृत झोपड्यांचे पेव?

महापे एमआयडीसी मधील मोकळ्या भूखंडावर झोपड्यांचे साम्राज्य

वाशी ः पावसाळ्यात अनधिकृत बांधकामे तसेच झोपड्यांवरील कारवाई थंडावते. याचाच गैरफायदा घेत महापे एमआयडीसी मधील मोकळ्या भुखंडांवर मागील काही दिवसांपासून अनधिकृत झोपड्या बांधण्यात येत आहेत. मात्र, सदर झोपड्यांकडे नवी मुंबई महापालिका आणि एमआयडीसी प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने दिवसेंदिवस या झोपड्यांमध्ये झपाट्याने वाढ होत चालली आहे.

नवी मुंबई शहराच्या पूर्वेला औद्योगिक वसाहत (टीटीसी) एमआयडीसी आहे. येथील हजारो प्रकल्पग्रस्तांकडून १९६६ मध्ये एक रुपया चौरस मीटर दराने शासनाने जमिनी विकत घेतल्या आहेत. भूमिपुत्रांच्या मुलांना नौकरी आणि रोजगार देण्याचे गाजर दाखवून हजारो हेक्टर जमिनी भूसंपादित केल्या आहेत. येथील ३०० ते ४०० एकर जमिनीवर कारखाने किंवा लहान- मोठे लघु उद्योग न आल्याने ‘एमआयडीसी'च्या संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे मोकळ्या भूखंडांवर झोपड्यांचे अतिक्रमण दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे या औद्योगिक क्षेत्राला समस्यांचे ग्रहण लागल्याचे चित्र दिसत आहे. महापे एमआयडीसी मधील मोकळ्या भूखंडांवर देखील बेकायदा झोपड्यांचे अतिक्रमण वाढत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. महापे एमआयडीसी ए ब्लॉक मधील मोकळ्या भुखंडांवर मागील काही दिवसांपासून झोपड्यांचे साम्राज्य उभे राहत आहे. या साऱ्या प्रकाराकडे नवी मुंबई महापालिका आणि एमआयडीसी प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे सदर झोपड्यांवर कारवाई करण्याची मागणी आता महापे मधील नागरिकांकडून जोर धरु लागली आहे.

मुंबईतील झोपडपट्टी दादांकडून झोपड्यांची उभारणी

नवी मुंबई शहरात जागेला आणि घरांना सोन्याचा भाव मिळत आहे. त्यामुळे गरीब, गरजू लोक इथे घर घेऊ शकत नाहीत. याचाच फायदा घेत मुंबईतील झोपडपट्टी दादा नवी मुंबई मधील स्थानिक राजकीय नेत्यांसोबत हातमिळवणी करुन नवी मुंबई मध्ये झोपड्या  उभारुन त्या गरीब लोकांच्या माथी मारत आहेत.

महापे येथील भूखंडावर अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या शेकडो झोपड्यांवर तत्कालीन नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी धडक कारवाई केली होती. त्यानंतर काही दिवसांनी ‘एमआयडीसी'च्या अधिकाऱ्यांची पाठ वळताच त्या ठिकाणी आता भूमाफियांनी अनेक झोपड्या उभारुन विकण्याचा सपाटा लावलेला आहे. महापे येथील भूखंडावर अनधिकृतपणे झोपड्या उभारणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. - नामदेव डाऊरकर, समाजसेवक - महापे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 न्हावा येथे २ हजार कांदळवन नष्ट