सिडकोच्या अभियांत्रिकी विभागात आनंदाचे वातावरण 

सिडकोतील रखडलेल्या पदोन्नतीला गती 

नवी मुंबई : सिडको महामंडळातील पात्र असलेल्या अधीक्षक अभियंत्यांना अतिरिक्त मुख्य अभियंतापदी बढती देण्यात आली आहे. तसेच सहाय्यक अभियंता (एई) आणि सहाय्यक कार्यकारी अभियंता (एईई) प्रवर्गांना प्रकल्प भत्त्यामध्ये वाढ देण्याची २०१४ पासून प्रलंबित असलेल्या मागणीला देखील सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे सिडको अभियंत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.  

सिडकोमध्ये रखडलेल्या पदोन्नत्या आणि प्रकल्प भत्त्यामध्ये वाढ, हा सिडकोच्या अधिकारी वर्गामध्ये मागील काही वर्षांपासून चिंतेचा आणि चर्चेचा विषय बनला होता. वास्तविक, सिडकोचे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना शहर, मेट्रो, कॉर्पोरेट पार्क वाणिज्यिक संकुल हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प विकासाच्या प्रक्रियेमध्ये असताना अभियंत्यांच्या भरतीला बसलेली खिळ आणि प्रकल्पांच्या अंमलबजावणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अधीक्षक अभियंत्यांच्या रखडलेल्या पदोन्नत्या, ही बाब या प्रकल्पांच्या दृष्टीने निश्चितच प्रतिकूल होती. 

त्यामुळे काहीशा रखडल्या गेलेल्या सिडको प्रकल्पांना गती देण्याचे काम डॉ. संजय मुखर्जी यांनी केले. त्याकरिता अनेक धडाडीचे निर्णय त्यांनी घेतले आहेत. अभियंत्यांच्या पदोन्नतीचा निर्णयही याच प्रकारातील असल्याचे बोलले जात आहे. 

दरम्यान, सिडकोतील सहाय्यक अभियंता आणि सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांच्या प्रकल्प भत्त्यामध्ये वाढ करण्याची तसेच पात्र असलेल्या अधीक्षक अभियंत्यांना अतिरिक्त मुख्य अभियंतापदी बढती देण्याची मागणी २०१४ पासून सातत्याने करण्यात येत होती. सिडकोच्या इंजिनिअरिंग असोसिएशनची ही मागणी  व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी नुकतीच मंजूर केली आहे. या प्रलंबित मागण्या मंजूर झाल्याने दिलासा मिळाल्याची व सिडको अभियंत्यांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याची प्रतिक्रिया सिडको इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी दिली. 

 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पावसाळयाच्या तोंडावर अनधिकृत झोपड्यांचे पेव?