पणन संचालकांच्या बाजूवर संचालक मंडळाचे भवितव्य

 एपीएमसी संचालक मंडळ बरखास्त करण्यास न्यायालयाची स्थगिती

वाशी ः वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) संचालक मंडळाचा कोरम पूर्ण होत नसल्याचे कारण देत सदर एपीएमसी संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासक का? नेमू नये म्हणून राज्य पणन संचालकांनी ८ एपीएमसी संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, त्याबाबत सुनावणी घ्ोण्यात येणार आहे. मात्र, पणन संचालकांनी बोलावलेल्या या सुनावणीस संचालक सुधीर कोठारी यांनी न्यायालयात आव्हान दिले असून, या सुनावणीस न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायालयात येत्या ६ जून २०२३ रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

राज्यात ‘कोरोना'मुळे आणि नंतर राजकीय ओबीसी आरक्षण नायालयात लटकल्याने राज्यातील महापालिकांवर शासनामार्फत प्रशासक कारभार पाहत आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वात मोठ्या मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक नेमण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून, त्यास अपूर्ण संचालक मंडळाचे कारण पुढे केले जात आहे. मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती मधील १८ पैकी १० सदस्य तांत्रिक दृष्ट्या अपात्र ठरल्याने केवळ ८ सदस्य शिल्लक आहेत. त्यामुळे एपीएमसी संचालक मंडळाचे कोरम अपूर्ण असल्याने बैठका अभावी संपूर्ण निर्णय प्रकिया ठप्प आहे. परिणामी १८ पैकी १० एपीएमसी संचालक अपात्र झाल्याने आणि संचालक मंडळातील सदस्यांकडे सोपविलेली कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम नसल्याचा निष्कर्ष काढत पणन संचालक विनायक कोकरे यांनी  मागील महिन्यात एपीएमसी संचालक मंडळ बरखास्त का करण्यात येऊ नये?, अशी विचारणा विद्यमान ८ एपीएमसी संचालकांना केली आहे. तांत्रिकदृष्ट्या अपात्र ठरलेल्या एपीएमसी संचालकांच्या संख्येमुळे एपीएमसी बाजार समितीचे कामकाज सुरळीत सुरु नसल्याचा तांत्रिक मुद्दा उपस्थित करुन एपीएमसी बाजार समिती बरखास्त करण्याची प्रक्रिया पणन संचालनालयाद्वारे सुरु करण्यात आली होती. त्यामुळे विविध तांत्रिक मुद्द्यांचा आधार घेत पणन संचालकांनी ८ एपीएमसी संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, १८ एप्रिल २०२३ पर्यंत लेखी खुलासा करण्याचे आदेश दिले होते. या नोटीसीवर एपीएमसी संचालकांनी त्यांचा समाधानकारक खुलासा न केल्यास पणन कायद्यानुसार कारवाईचा इशारा दिला होता. मात्र, सदर उत्तर देण्यास पणन संचालकांनी दोन वेळा मुदतवाढ दिली होती. आज ११ मे रोजी अंतिम मुदत आहे. मात्र, एपीएमसी संचालक मंडळ बरखास्त करण्यास येथील संचालकांचा विरोध आहे. या नोटीसीला एपीएमसी संचालक सुधीर कोठारी यांनी न्यायालयात आव्हान दिले असून, आज ११ मे रोजी होणाऱ्या सुनावणीस स्थगिती दिली आहे. न्यायालयात पुढील सुनावणी ६ जून २०२३ रोजी होणार आहे. या सुनावणीत पणन संचालक काय बाजू मांडतात यावर एपीएमसी बाजार समिती संचालक मंडळाचे भवितव्य ठरणार आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सिडकोच्या अभियांत्रिकी विभागात आनंदाचे वातावरण