प्रदुषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

कासाडी नदीतील विघातक प्रदुषणामुळे म्हशीचा मृत्यू; दुसरीचे जळाले शरीर

नवीन पनवेल ः तळोजा एमआयडीसी विभागातील पडघे गावातील बारकू हिरा पाटील यांच्या मालकीच्या २ म्हशींपैकी एका म्हशीने कासाडी नदीचे पाणी पिण्याने तिचा मृत्यू झाला आहे, तर दुसऱ्या म्हशीला जेवढा पाण्याचा स्पर्श झाला तेवढे तिचा शरीर जळले आहे. सदरची घटना ८ मे रोजी सायंकाळी ४ च्या सुमारास घडली.

दरम्यान, कासाडी नदी मधील रासायनिक पाण्याने पात्रातील गवत आणि छोटी वृक्ष जळून गेली आहेत. तळोजा मधील कारखाने कासाडी नदीपात्रात सोडत असलेली विघातक रसायने नदीत वाहत असून त्याने नागरिकांसह जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सदर भयावह प्रदुषणाला सर्वस्वी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि तळोजा औद्योगिक विकास मंडळ जबाबदार असल्याचा आरोप ‘पनवेल जिल्हा काँग्रेस'चे पर्यावरण अध्यक्ष सुरेश पाटील यांनी केला आहे. ८ मे रोजी सायंकाळी ४ च्या सुमारास पडघे गावातील बारकू पाटील यांनी आपल्या दोन म्हशींना चरण्यासााठी कासाडी नदी पात्राजवळ नेले होते. त्यावेळी त्यातील एक म्हैस कासाडी नदीमधील पाणी पिताच ती क्षणार्धात गतप्राण झाली, तर दुसरी म्हैस कासाडी नदीच्या पाण्यात जेवढी उतरल्यावर तिच्या शरीराचा नदीतील पाण्याची संपर्क आला तेवढेच तिचे शरीर जळून गेले आहे. त्यामुळे नदीतील पाण्याचे नमुने बारकु पाटील यांनी घेतले असून ते तपासणीसाठी पाठविले आहेत. या पाण्याचे नमुने ‘प्रदुषण नियंत्रण मंडळ'च्या अधिकाऱ्यांनाही त्यांनी दिले आहेत.

तळोजा विभागातील कारखान्यांकडून होणाऱ्या भयावह प्रदुषणामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून त्यांना अस्थमा, हृदयाचे आजार जडले आहेत, तर लहान मुलांच्या वाढीवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. तळोजा परिसरातील वाढत्या प्रदुषणामुळे आजुबाजुच्या गावातील ग्रामस्थांना दरवाजे बंद ठेवावे लागत आहेत. येथील स्थानिक ग्रामस्थांच्या आरोग्याचे संरक्षण करतानाच येथील प्रदुषणाला जबाबदार असलेल्या तळोजा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, प्रदुषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी या आस्थापना विरोधात
‘राष्ट्रीय हरित लवाद'कडे  दाद मागण्यात आली आहे. त्याअनुषंगाने तळोजा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर ताषेरे ओढत या प्रकल्पाला १५ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात येवून येथील प्रदुषणावर तातडीने उपाय करण्यात यावेत, असे आदेश देण्यात आले. सीईटीपी प्रकल्पाचा कारभार ‘एमआयडीसी'कडे सोपविण्यात आला. पण, सीईटीपी कामकाजात काही सुधारणा केल्याचे दिसून येत नाही. याउलट यात भर पडून कासाडी नदी विघातक रासायनिक पाण्याने वाहत आहे. कारखान्यांकडून राष्ट्रीय हरित लवाद न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला जात आहे. ‘एमआयडीसी'तर्फे कारखान्यातील पाण्याचे नमुने घेवून जो कारखाना प्रदुषण करत आहे, त्याला ब्लॅकमेल केला जात असल्याचा गंभीर आरोप सुरेश पाटील यांनी आहे.

तळोजा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प ‘प्रदुषण नियंत्रण मंडळ'च्या आखत्यारित येत आहे. मी एक सिव्हील इंजिनियर आहे. या विभागाकडून रस्ते बनविण्याचे काम केले जात आहे. येथील प्रदुषणाशी कोणताही संबंध नाही. -बोबोडे पाटील, उपभियांता-तळोजा औद्योगिक विकास मंडळ.

तळोजा औद्योगिक विभागातील भयानक प्रदुषणाने नागरिकांना जीवन नकोसे केले आहे. न्यायालयाचा अवमान केला जात असून प्रदुषण करणाऱ्या कोणत्याही कारखान्यावर कारवाई केली जात नाही. उलट जेवढे प्रदुषण जास्त होईल तेवढे अधिकारी मालामाल होत आहेत. येथील काही कारखान्यांमध्ये ईटीपी प्लॅन नाहीत. ते बिनधास्त कासाडी नदीत पाणी सोडत असून नदी प्रदुषित झाली आहे. -सुरेश पाटील, अध्यक्ष-पनवेल जिल्हा काँग्रेस पर्यावरण सेल.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

लोकप्रतिनिधी नितीन पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे ‘गॅस लाईन'च्या कामाला सुरुवात