महापालिका, वाहतूक पोलीस विभागाचे दुर्लक्ष?

 गॅस वितरकांकडून अपघाताला निमंत्रण

वाशी ः नवी मुंबई शहरात जागो-जागी शहरी वस्तीत घरघुती आणि व्यावसायिक ‘गॅस'ने भरलेली वाहने उभी करुन याच ठिकाणी गॅस हाताळणी केली जात आहे. रस्त्यावरच गॅस हाताळले जात असल्याने भविष्यात ‘गॅस सिलिंडर'चा स्फोट झाला तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, सदर सारा प्रकार नवी मुंबई महापालिका अतिक्रमण विभाग आणि वाहतूक विभागाला ज्ञात असून देखील यावर कुठलीच ठोस कारवाई केली जात नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

 नवी मुंबई शहरात वाशी, कोपरखैरणे, सानपाडा, घणसोली, नेरुळ आदी ठिकाणी घरघुती सिलेंडर पुरवणाऱ्या एजन्सी आहेत. या ठिकाणी गॅस घेऊन रोज मोठी वाहने येत असतात. या मोठ्या वाहनांमधून नवी मुंबई शहरातील इतर भागात गॅस पुरवठा करण्यासाठी छोट्या वाहनात गॅस सिलिंडर भरले जातात. मात्र, गॅस हाताळणी देखील रस्त्यावरच केली जात आहे. तर गॅस सिलेंडर भरणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे एखादे वाहन या ‘गॅस'च्या वाहनाला धडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर गॅस हाताळणी रस्त्यावरच होत असल्याने भविष्यात जर एखाद्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाला तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गॅस सिलेंडर वाहने नागरी वस्तीपासून दूर ठेवावी, जेणे करुन या वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी तर दूर तर होईलच शिवाय गॅस सिलिंडरमुळे जर एखादा स्फोट झाला तर होणारी हानी टाळता येऊ शकते, अशी मागणी होत आहे. मात्र, सदर सारा प्रकार नवी मुंबई महापालिका अतिक्रमण विभाग आणि नवी मुंबई वाहतूक पोलीस विभागाला ज्ञात असून देखील गॅस वितरकांवर कुठलीच  कारवाई केली जात नाही. त्यामुळे भविष्यात एखादी मोठी दुर्घटना होण्याची वाट प्रशासन पाहत आहे का?, असा सवाल नागरीक उपस्थित करीत आहेत.

वाशी-कोपखैरणे मार्गावर मरीआई मंदिरासमोर रोज रस्त्यावरच गॅस हाताळणी केली जाते. यातील बहुतांश वाहने वाहतुकीच्या विरुध्द बाजुने उभी असतात. त्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता अधिक आहे. मात्र, या वाहनांकडे नवी मुंबई महापालिका अतिक्रमण विभाग आणि नवी मुंबई वाहतूक पोलीस वाहतूक विभागाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. - प्रवीण पाटील, वाहन चालक - नवी मुंबई. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

प्रदुषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात