‘सिडको'च्या नवीन शहर प्रकल्पांतील अकरावे शहर

शासन उभारणार जालना-खरपुडी नवीन शहर

नवी मुंबई ः महाराष्ट्र शासनातर्फे, महाराष्ट्र प्रादेशिक-नगररचना अधिनयम, १९६६ अंतर्गत जालना-खरपुडी नवीन शहर प्रकल्पासाठी ‘सिडको'ची नवीन शहर विकास प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ‘सिडको'तर्फे राज्यामध्ये विकसित केलेल्या नवीन शहर प्रकल्पांपैकी सदरचे अकरावे शहर असणार आहे.

राज्य शासनातर्फे २०१९ मध्ये जालना-खरपुडी अधिसूचित क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात आले होते. परंतु, त्यानंतर शासनाकडून सदर क्षेत्र निरधिसूचित (डिनोटीफाईड) करण्यात आले. तद्‌नंतर ‘सिडको'तर्फे जालना-खरपुडी क्षेत्र विकसित करण्यासाठी आपली विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात यावी, अशी विनंती शासनाला करण्यात आली होती. त्यानुसार, संचालक-नगर नियोजन, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याशी विचारविनिमय केल्यानंतर शासनातर्फे सदर क्षेत्र नवीन शहर आणि ‘सिडको'ला जालना-खरपुडी नवीन शहर विकास प्राधिकरण म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

जालना-खरपुडी प्रकल्पाच्या कामाचा आवाका आणि त्याची जटीलता या कामासाठी नवीन यंत्रणा उभी करुन जनहितासाठी कामे हाती घेऊन ते पूर्ण करण्यासाठी लागणारा तुलनात्मक वेळ, या बाबींचा विचार करता शासनाच्या मालकीच्या किंवा शासन नियंत्रित महामंडळाचे अभिकरण किंवा कंपनी किंवा दुय्यम कंपनी तर्फे सद प्रकल्प पूर्ण करण्यात यावा, असा विचार पुढे आला.

जालना-खरपुडी अधिसूचित क्षेत्रासाठी सिडकोची नियुक्ती करण्यासंदर्भात शासनातर्फे जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, जालना-खरपुडी अधिसूचित क्षेत्र सर्वप्रथम ‘सिडको'कडून या क्षेत्रासाठी सादर करण्यात येणाऱ्या आर्थिक सुसाध्यता अहवालाच्या अधीन असणार आहे. जालना-खरपुडी क्षेत्रासाठी ‘सिडको'ची नवीन शहर विकास प्राधिकरण म्हणून नियुक्ती झाल्याच्या तारखेपासून सदर अधिसूचित क्षेत्रामध्ये यापूर्वी कार्यरत असलेल्या अन्य कोणत्याही विशेष नियोजन प्राधिकरणाचे कार्य संपुष्टात येईल. सिडको सदर अधिसूचित क्षेत्रासाठी नियोजन प्रस्ताव तयार करुन प्रकाशित करेल. महाराष्ट्र प्रादेशिक-नगररचना अधिनियम, १९६६ मध्ये नमूद प्रक्रियेचे पालन करुन प्रस्ताव शासनाला सादर करेल. सदर अधिसूचित क्षेत्राकरिता एकात्मिक विकास नियंत्रण-प्रोत्साहन नियमावली लागू होणार आहे.

‘सिडको'च्या नगर नियोजन आणि विकास क्षेत्रातील दीर्घ तसेच उत्कृष्ट कामगिरीमुळे ‘सिडको'वर आजवर राज्यातील विविध नवीन शहरांचा विकास करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ‘सिडको'ने सदर जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडत नवीन औरंगाबाद, नवीन नाशिक, ओरोस, वसई-विरार उपप्रदेश आदि नवीन शहरे विकसित केली आहेत. जालना-खरपुडी नवीन शहर ‘सिडको'तर्फे हाती घेण्यात येणाऱ्या नवीन शहर प्रकल्पांतील अकरावा प्रकल्प आहे.

दरम्यान, या प्रकल्पाचा आर्थिक सुसाध्यता अहवाल तयार करण्यासाठी ‘सिडको'तर्फे काम सुरु करण्यात आले आहे.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिका, वाहतूक पोलीस विभागाचे दुर्लक्ष?