यंदाही नवी मुंबई शहरावर पुराचे सावट कायम ?

‘होल्डींग पाँड'च्या ‘सफाई'ला कांदळवन परवानगीचा ब्रेक

वाशी ः नवी मुंबई शहरात पावसाचे पाणी शिरु नये, याकरिता सिडको मार्फत होल्डींग पाँड बनवले आहेत. मात्र, सदर होल्डींग पाँड मध्ये खारफुटी तयार झाल्याने सफाईसाठी ‘एमसीझेडएमए'ची परवानगी आवश्यक आहे. मात्र, सदर परवानगी अजूनही प्राप्त न झाल्याने यंदाही पावसाळयात नवी मुंबई शहरावर पुराचे सावट कायम आहे.

महाराष्ट्र राज्यात २००५ पासून खारफुटी संवर्धन कायदा लागू झाला आहे. त्यामुळे खारफुटी परिसरात कोणत्याही प्रकारची कामे करण्यास बंदी घालण्यात आली आहे. परिणामी नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील ११ होल्डींग तलाव आणि स्ट्रॉम वॉटर पंप हाऊस लगत असलेले दोन होल्डींग तलाव असे एकूण १३ होल्डींग तलाव गेल्या १८ वर्षांपासून साफ करणे शक्य झालेले नाही. कायदेशीर डावपेचांमुळे, खारफुटीमुळे सर्व होल्डींग तलावांची साफसफाई थांबली आहे. त्यामुळे योजनाबध्द नवी मुंबई शहरावर पुराचा धोका वाढत आहे.

नवी मुंबई शहर वसवताना ‘सिडको'ने या ठिकाणच्या भौगोलिक स्थितीचा अभ्यास केला असून, खाडीच्या काठावरील बेलापूर, सानपाडा, वाशी, कोपरखैरणे आणि ऐरोली विभागात होल्डिंग पाँड बांधण्यात आला. या होल्डींग पाँड मध्ये पावसाळ्यात पावसाचे पाणी जमा करुन खाडीत सोडले जाते. या व्यवस्थेमुळे पावसाळ्यात नवी मुंबई शहरात पाणी साचत नाही. परंतु, सदर ‘होल्डींग पाँड'ची साफसफाई न केल्यामुळे या सर्व होल्डींग तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ आणि इतर कचरा साचला आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून नवी मुंबईतील बेलापूर, नेरुळ, वाशी या भागात पाणी साचण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिका प्रशासन चिंतेत आहे. सदर होल्डींग पाँड साफ करण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील असून, त्याचा प्राथमिक अहवाल एमसीझेडएमएकडे सादर करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका प्रशासन सदर प्रश्न सोडवण्यात गुंतले आहे. त्यासाठी महापालिकेने सन २०१३ मध्ये राज्याच्या ‘एमसीझेडएमए'कडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावामुळे होल्डींग तलावाची साफसफाई करण्यात आली होती. परंतु, त्यानंतर २०-२१ मध्ये हे प्रकरण राष्ट्रीय किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरणाकडे (एमसीझेडएमए) गेले. ज्यांच्याकडे महापालिकेने यासंदर्भात प्रस्ताव पाठवला होता त्यांनी सदर प्रस्तावाचा अभ्यास करुन पुन्हा प्रस्ताव मांडण्यास सांगितले. या संदर्भात तज्ज्ञांकडून अभ्यास करुन महापालिकेने प्राथमिक अहवाल सदर प्राधिकरणाला सादर केला आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरातील होल्डींग पाँड मधील गाळ काढण्याची परवानगी यंदा देखील मिळणार नसल्याने पावसाळ्यात नवी मुंबई शहरावर पुराचे सावट कायम राहणार आहे.

भरतीच्या कालावधीत खाडीचे वाढलेले पाणी होल्डींग पाँडमधून नवी मुंबई शहरात शिरु नये म्हणून स्वयंचलित पलॅप गेट्‌स लावण्यात आलेले आहेत. सदर पलॅप गेट्‌स सुव्यवस्थितरित्या कार्यान्वित राहतील याकडे लक्ष देण्याच्या सूचना करीत नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी आवश्यक त्या ठिकाणी नवीन पलॅप गेट्‌स लावून तसेच सर्व गटार कचरा मुक्त करुन घ्यावेत असेही निर्देशित केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बिल्डर विरुध्द सात दिवसामध्ये कारवाई करण्याचे निर्देश