मालमत्ता कर थकबाकीदारांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार लघुउद्योजकांना नोटीसा

मालमत्ता कर न भरणाऱ्या ४२४ लघुउद्योजकांवर नवी मुंबईमहापालिका करणार कारवाई

तुर्भे : महापालिकेच्या स्थापनेपासून मालमत्ता कर न भरणाऱ्या ४२४ लघुउद्योजकांवर मालमत्ता कर विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. या थकबाकीदारांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सोमवारपासून नोटीसा बजावण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिली. कर वसुलीसाठी प्रसंगी न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांच्या मालमत्ताही सील करण्याची कारवाई करण्यात येईल, असे नार्वेकर यांनी सांगितले.

नवी मुंबई महापालिका थेट ग्रामपंचायतीतून निर्माण झाली. त्यानंतर मालमत्ता कराची अवास्तव आकारणी केल्याचा आरोप करत लोकप्रतिनिधींनीनी आंदोलन केले होते. परिणामी काही प्रमाणात कर अल्प झाला. त्यामुळे आपणही आंदोलन केले, तर आपलाही फायदा होईल, असा गोडगैरसमज बेलापूर पट्टीतील उद्योजकांना झाला. त्यांनीही आपण औद्योगिक क्षेत्रात असल्याने महापालिकेने लागू केलेला मालमत्ता कर भरणार नसल्याचे सांगत आंदोलन केले. नंतर महापालिका औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधा देत नसल्याचा दावा करत मालमत्ता कर भरण्यास नकार देत न्यायालयात याचिका प्रविष्ट केली. उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयापर्यंत हे प्रकरण गेले. अखेर मागील महिन्यात न्यायालयाने सर्व थकबाकीदार लघुउद्योजकांनी मालमत्ता कर भरला नाही, तर पुढील सुनावणी घेणार नाही, असे स्पष्ट केले. तसेच कर वसुलीसाठी त्यांच्या मालमत्ता सील करण्याचेही आदेश दिले आहेत.

महापालिका क्षेत्रात अनुमाने १ हजार ६५० लघुउद्योजक असून त्यापैकी मालमत्ता कराची मूळ रक्कम भरणारे ५९७, नियमितपणे कर भरणारे ४९७ जण असून त्यांच्याकडून सुमारे ९ कोटी ५० लाख रुपयांचा कर प्राप्त झाला आहे. तसेच अद्यापपर्यंत एकदाही मालमत्ता कर न भरणारे ४२४ लघुउद्योजक आहेत. या थकबाकीदारांकडून सुमारे १५० कोटी रुपयांहून अधिक रक्कम पालिकेला येणे आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबईत फलकांवरील जाहिराती स्पष्ट दिसाव्या म्हणून झाडांवर कुऱ्हाड