एपीएमसी बाजारची अग्निसुरक्षा वाऱ्यावर?

वाशी मधील  एपीएमसी बाजारची अग्निसुरक्षा वाऱ्यावर?

वाशी ः आशिया खंडातील सर्वाधिक मोठी बाजारपेठ आणि रोज हजारो कोटीची उलाढाल असलेल्या वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मार्केटची अग्निसुरक्षा वाऱ्यावर सोडण्यात आली आहे. त्यामुळे वारंवार आगीच्या घटनांमुळे एपीएमसी मार्केट पूर्णपणे आगीच्या भक्षस्थानी सापडण्याच्या स्थितीमध्ये आहे. पाचही एपीएमसी मार्केटमध्ये सतत आगीच्या घटना घडत असतानाही अग्नी सुरक्षेकडे दुर्लक्ष होत आहे.

वाशी सेक्टर-१९ मध्ये सुमारे १७५ एकर जमिनीवर मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) उभारण्यात आली आहे. एपीएमसी मार्केट मध्ये कांदा-बटाटा, मसाला, धान्य, भाजीपाला आणि फळ या पाच मार्केटचा समावेश आहे. या प्रत्येक मार्केटमध्ये किमान आठशे ते एक हजार व्यावसायिक गाळे आहेत. शिवाय प्रत्येक मार्केटमध्ये निर्यात भवन आणि मध्यवर्ती सुविधा केंद्रे आहेत. यामुळे प्रतिदिन या ठिकाणी एक ते सव्वा लाखाहून अधिक नागरिक आणि व्यापाऱ्यांची वर्दळ असते. याशिवाय हजाराेंच्या संख्येने मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची रहदारी सुरु असते. मात्र, एपीएमसी मार्केट मध्ये एपीएमसी प्रशासनाची स्वतःची अग्निशमन यंत्रणाच नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे एपीएमसी मार्केट आवारात आगीची मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती वर्तविली जात आहे.

एपीएमसी आवारातील बहुतांश गाळ्यांमध्ये अनधिकृत पोटमाळे तयार करुन मालाचा साठा, छोटे कारखाने तसेच कामगारांसाठी रहिवासी वापर सुरु करण्यात आला आहे. या ठिकाणी आग लागल्यास काही क्षणांत ती परिसरातील इतरही गाळे खाक करुन जीवित हानी होऊ शकते. परंतु, एपीएमसी बाजार समितीची स्वतःची अग्निशमन यंत्रणा नसल्याने नवी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाला बचाव कार्यासाठी जावे लागते. याबाबत महापालिका अग्निशनमन दलाने देखील एपीएमसी प्रशासनास सूचना केल्या आहेत. मात्र, सूचना करुन देखील एपीएमसी प्रशासनाने त्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत बाजार घटकांच्या जीवाशी खेळ मांडला आहे.याबाबत ‘एपीएमसी मार्वेÀट'चे कार्यकारी अभियंता सुरेश मोहाडे यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद लाभला नाही.


रुग्णवाहिकेचा देखील अभाव
एखादा सामाजिक किंवा राजकीय गर्दीचा कार्यक्रम असल्यास त्या ठिकाणी अग्निशमन वाहन, रुग्णवाहिका तैनात ठेवल्या जातात. मात्र, वाशी मधील एपीएमसी बाजारात व्यापारी, कामगार, ग्राहक, वाहन चालक मिळून रोज सव्वा लाखाच्यावर नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे या ठिकाणी काही अपघात किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती उद्‌भवल्यास रुग्णाला दवाखान्यात नेण्यासाठी स्वतःच्या एकाही रुग्णवाहिकेची एपीएमसी प्रशासनामार्फत आजतागायत व्यवस्था करण्यात आलेली नाही. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मालमत्ता कर थकबाकीदारांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार लघुउद्योजकांना नोटीसा