शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
लहरी हवामानामुळे हापूस उत्पादनात ८२ ते ८४ % घट
हवामान बदल, ढगाळ वातावरण, अवकाळी पावसामुळे यंदा हापूस आंबा उत्पादनात घट
वाशी ः राज्यात पडणारा अवकाळी पाऊस तर कधी कडक उन्ह, यामुळे राज्यात बदलणाऱ्या या लहरी हवामानामुळे शेतमालाच्या सर्व पिकांवर परिणाम झाला असून, त्यातून कोकणातील हापूस आंबा देखील वाचला नाही. हवामान बदल, ढगाळ वातावरण, अवकाळी पावसामुळे यंदा हापूस आंबा उत्पादनात कमालीची घट झाली आहे. यंदा अवघ्ो १६ % ते १८ % उत्पादन असून, मागील ६ वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वात निचांकी उत्पादन आहे.
वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ बाजारात एप्रिल-मे महिन्यात मोठ्या प्रमाणावर कोकणातील हापूस आंबा दाखल होण्यास सुरुवात होते. परंतु, यंदा उलट परिस्थिती असून, ऐन हंगामात केवळ १८ हजार ते २० हजार पेट्या हापूस आंबा दाखल होत आहे. कोकणात दोन ते तीन वेळा मोहोर आला. यामुळे मोठया प्रमाणात हापूस आंबा फळधारणा झाली नाही. मोहोर संवर्धानात अडथळा आणि त्याचवेळी वातावरणात झालेल्या बदलांमुळे किड रोगांचा मोठया प्रमाणात प्रादुर्भाव, या सर्वांचा परिणाम आंब्याचे खास करुन हापूस आंब्याचे उत्पादन घटण्यावर झाला. गेल्या मार्च महिन्यामध्ये अवकाळी पावसाच्या भीतीने वेळेआधीच आंबे तोडणी केल्यामुळे, कोकणातील सर्वच विभागातून एकाच वेळी हापूस दाखल झाल्याने मार्च मध्ये ३-४ पटीने हापूस आंबा आवक वाढली.
अवकाळी पावसाने आंबेगळही झाली असल्याने मे महिन्यांत कमी प्रमाणात हापूस आंबा दाखल होत आहे. रत्नागिरी, देवगड प्रमाणे रायगड मधील हापूस देखील बाजारात दाखल होत असतो. मात्र, रायगड मधील हापूस आंबा १५ मे नंतर बाजारात दाखल होणार आहे.
यंदा लहरी हवामानाचा हापूस आंबा उत्पादनाला जबर फटका बसला आहे. त्यामुळे हापूस आंबा उत्पादनात कमालीची घट झाली असून, यंदा अवघे १६ % ते १८ % उत्पादन झाले आहे. मागील ६ वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वात निचांकी हापूस आंबा उत्पादन आहे, असे मत आंबा उत्पादकांनी व्यक्त केले.
एपीएमसी फळ बाजारात सध्या कोकणातील हापूस कमी प्रमाणात दाखल होत आहे. तर दुसरीकडे कर्नाटकी आंबा मोठ्या प्रमाणात दाखल होत असून, कर्नाटकी आंबा दिसायला हापूस सारखाच असल्याने हापूस आंब्याच्या नावाखाली कर्नाटकी आंब्याची विक्री होत आहे. कर्नाटकी आंबे कोकण हापूस आंब्याच्या तुलनेत फारच स्वस्त आहेत. त्यामुळे आधीच उत्पादन कमी असलेल्या हापूस आंब्याला पुढील कालावधीत चांगला दर मिळेल का?, असा प्रश्न आंबा उत्पादकांकडून उपस्थित केला जात आहे.
यावर्षी कोकणात हापूस आंब्याचे उत्पादन मोठया प्रमाणात घटून अवघ्ो १६ ते १८ टक्यावर आले आहे. मागील ६ वर्षात सर्वांत कमी उत्पादनाचे यंदाचे वर्ष ठरत आहे. जागतिक हवामान बदलाचा फटका तापमान वृध्दी, अवकाळी अतिवृष्टी, आभ्राच्छादित वातावरण यामुळे यावर्षी हापूस आंबा उत्पादनात घट झाली आहे. - चंद्रकांत मोकल, अध्यक्ष - महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ.