‘महापालिका'ने सानपाडा मध्ये कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या विविध वास्तू वापराविना धूळखात

‘महापालिका'ने सानपाडा मध्ये बांधलेल्या विविध वास्तू वापराविना धूळखात

तुर्भे ः नवी मुंबई महापालिकेने सानपाडा विभागात कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या विविध वास्तू वापराविना धूळखात पडून आहेत. या प्रकरणी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निलेश कचरे यांनी केली आहे.  महापालिकेने सानपाडा मध्ये बांधलेल्या काही वास्तंूचे उदघाटन होऊनही त्यांचा वापर होत नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते निलेश कचरे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.  काही वास्तू उद्‌घाटनाच्या फेऱ्यात अडकून पडल्याने जनतेसाठी उपलब्ध करुन दिल्या जात नाहीत, असा आरोप निलेश कचरे यांनी केला आहे.

नवी मुंबई महापालिका तर्फे सानपाडा सेक्टर-५ मधील भूखंड क्रमांक ५१५ ए आणि ५१५ बी याठिकाणी महिला सक्षमीकरण केंद्र, ४० प्लस क्रिकेट कार्यालय तसेच ज्येष्ठ नागरिक केंद्र अशी बहुउद्देशिय इमारत उभारण्यात आली आहे. सदर इमारतीस बांधकाम खर्च अंदाजे १ कोटी रुपयांपेक्षा अधिक आला आहे. सदर इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन १ वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला असला तरी अद्याप त्या बहुउद्देशीय इमारतीचे लोकार्पण करण्यात आले नाही. त्यानंतर सानपाडा सेक्टर-५ मधील भूखंड क्रमांक ५१५ आणि ५१६ येथील महापालिका शाळेच्या आवारात ५७ लाख इतकी रवकम खर्चून व्यायामशाळा बांधण्यात आली. २०१९ या वर्षी पूर्णत्वास आलेल्या या व्यायामशाळेचे अनेक राजकीय नेत्यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. या व्यायामशाळेचा स्थानिक मुलांना तसेच स्थानिक नागरिकांना लाभ होईल, असे सांगण्यात आले. परंतु २०२३ साल उजाडले, तरी या व्यायामशाळेच्या इमारतीला अद्याप टाळे लागल्याचे दिसून येत आहे.

महापालिकेकडून सानपाडा सेक्टर-४ येथे सानपाडा विभागातील भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फुल विक्रेते तसेच मासे विक्रेते यांच्या सोयीसाठी २००० साली दैनंदिन बाजार संकुल बांधण्यात आले. सदर इमारतीस अंदाजे १ कोटीहून अधिक खर्च आला असून, सदर वास्तू २ वर्षापासून पूर्ण होऊन देखील बंद अवस्थेत आहे. बाजार संकुल बंद अवस्थेत असल्यामुळे विक्रेत्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

जनतेच्या सुविधांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करुन वास्तू बांधण्यात येतात. मात्र, त्या वेळेत जनतेसाठी उपलब्ध करुन दिल्या जात नाहीत. याकडे महापालिका अधिकारी जाणीवूर्वक दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते निलेश कचरे यांनी केला आहे. या विषयी चौकशी करुन बंद असलेल्या इमारतींचा वापर त्वरित चालू करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निलेश कचरे यांनी केली आहे. या विषयी सामाजिक कार्यकर्ते निलेश कचरे यांनी नियंत्रक आणि महालेखा परीक्षक, मुख्यमंत्री, महापालिका आयुक्त यांच्याकडे तक्रार केली आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

लहरी हवामानामुळे हापूस उत्पादनात ८२ ते ८४ % घट