नवी मुंबईत मेट्रो ऐवजी धावणार मेट्रो-निओ

नवी मुंबईत स्टँडर्ड गेज ‘मेट्रो'च्या जागी ‘मेट्रो-निओ' धावणार 

नवी मुंबई ः नवी मुंबई मध्ये आता ‘मेट्रो-१'चे काम (बेलापूर ते पेंधर) पूर्णत्वास आल्याने लवकरच या मेट्रो मार्गाचे लोकार्पण केले जाणार आहे. परंतु, नवी मुंबईत ‘सिडको'च्या वतीने भविष्यात साकारल्या जाणाऱ्या ‘मेट्रो'चा प्रवास आता अधिक सुखमय आणि आरामदायी करतानाच नव्या सुधारित पध्दतीसह मेट्रो लाईन क्र.२, ३ आणि ४ ची अंमलबजावणी करण्यास ‘सिडको'ने मान्यता दिली आहे. स्टँडर्ड गेज ‘मेट्रो'च्या जागी ‘मेट्रो-निओ' या नव्या वाहतुकीच्या पर्यायाची अंमलबजावणी करण्यात येणार  असल्याची माहिती
‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली. मेट्रो-निओ ओव्हरहेड ट्रक्शन सिस्टीम द्वारे चालवलेली रबर टायर बाय-आर्टीक्युलेटेड इलेक्ट्रिक ट्रॉली-बस असल्याचे डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले.

मेट्रो-निओ एक नाविन्यपूर्ण वाहतूक व्यवस्था असून २० लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या शहरांसाठी विकसित केलेली वाहतूक सेवा आहे. सदरची सुलभ, जलद, विश्वासार्ह आणि किफायतशीर मास रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टीम (एमआरटीएस) असून मेट्रो निओ प्रवाशांना मेट्रो सेवेसारख्याच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रवासाची अनुभूती देईल, असा विश्वास व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी व्यक्त केला. ओव्हरहेड इलेक्ट्रिक ट्रक्शन द्वारे चालणारी ‘मेट्रो-निओ' एक बाय-आर्टीक्युलेटेड ट्रॉली बस प्रणाली असून ती वातानुकूलित, ऑटोमॅटिक डोअर क्लोजिंग सिस्टीम, लेव्हल बोर्डिंग, आरामदायी आसन सुविधा, प्रवाशांसाठी घोषणा, इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले वरील माहिती सुविधांनी युक्त आहे. ‘मेट्रो-निओ'चे डबे पारंपारिक मेट्रो ट्रेनपेक्षा लहान आणि वजनाने हलके असणार आहेत.

मेट्रो-निओ एक अत्याधुनिक, आरामदायी, ऊर्जा कार्यक्षम, कमीत कमी ध्वनी प्रदुषण आणि पर्यावरणपुरक प्रणाली आहे. ती रबर टायर्सवर चालणारी पहिली एमआरटीएस प्रणाली असणार आहे. भारतातील एक नाविन्यपूर्ण प्रकल्प ठरणारा नवी मुंबई मेट्रो प्रकल्प मेट्रो-निओ एमआरटीएसचा एक भाग म्हणून विकसित केला जात आहे. -डॉ. संजय मुखर्जी, व्यवस्थापकीय संचालक-सिडको.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘महापालिका'ने सानपाडा मध्ये कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या विविध वास्तू वापराविना धूळखात