शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
कोपरखैरणे येथे ३३ बाटल्या रक्त संकलन
कोपरखैरणे येथे रक्तदान शिबिर, वृक्ष वाटप व मोफत नेत्र चिकित्सा शिबिर संपन्न
नवी मुंबई : महाराष्ट्र दिन आणि उद्योजक दिनाचे औचित्य साधून ज्ञानदीप ट्रस्ट महाराष्ट्र राज्य आणि सद्गुरु ब्रह्ममूर्ती शांताराम महाराज जाधव सामाजिक सेवा ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांचे संस्थापक ह. भ. प. ब्रह्ममूर्ती शांताराम महाराज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर, वृक्ष वाटप व मोफत नेत्र चिकित्सा शिबिर १ मे रोजी आयोजित करण्यात आले होते. ५८ जणांची यावेळी रक्त तपासणी करण्यात आली व ३३ बाटल्या रक्त संकलन झाले.
ज्ञान विकास विद्यालय कोपरखैरणे येथे संस्थेचे प्रमुख ॲड पी. सी पाटील यांच्या सहकार्याने पार पडलेल्या या उपक्रम प्रसंगी उद्घाटक म्हणून माध्यम प्रायोजक दै. न्युजबॅण्ड व दै. आपलं नवे शहरच्या वतीने उपसंपादक राजेंद्र घरत, पोलीस अधिकारी विश्वास देसाई, दळवी गुरुकिल्ली अकादमीचे संस्थापक प्रदीप दळवी, ‘हक्काचा आवाजचे प्रवीण हांडे, समाजसेवक कृष्णा पाटील हे मान्यवर उपस्थित होते. राजेंद्र घरत, विश्वास देसाई, प्रदीप दळवी यांचा यावेळी यथोचित सत्कार केल्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. संस्थेचे विश्वस्त सुखदेवजी लांडगे यांनी त्यांच्या उपस्थितीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सद्गुरु रक्तपेढी नवी मुंबई यांच्या वैद्यकीय कमिटीने रक्तदान शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यांच्याबद्दल ह.भ.प.रामदास महाराज झोडगे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. नेत्रचिकित्सा शिबिरासाठी इनफिगो आय केअर वाशी, नवी मुंबई मधील विक्रम कुलकर्णी व त्यांच्या टीमने उपस्थित सर्व वयोवृद्ध तरुण बालवर्ग यांचे डोळे तपासणी करून त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उपचारासाठी रुपये अडीच हजाराचे कुपन देण्यात त्यांना आले. या कार्यक्रमाच्या सांगतेप्रसंगी हरिभक्ती परायण महिला कीर्तनकार संगीताताई महाराज काठोळे, नादब्रह्म पख्वाजचे संस्थापक ह.भ.प.कृष्णाजी महाराज झोडगे यांनी पख्वाज आणि संगीताबद्दल मार्गदर्शन केले. स्वयंसेवक भाऊसाहेब आरोटे, सागर आरोटे, सुमित मोरे, हरिदास जायभाये, कुणाल जाधव, सर्वेश झोडगे, भूषण गीते, स्वप्नील भंडारे यांच्या मेहनतीबद्दल ह.भ.प. दिगंबरजी महाराज जाधव यांनी कृतज्ञता व्यवत केली. सेव फार्मर्स आणि सेव्ह अर्थ फाउंडेशन महाराष्ट्र राज्यचे संस्थापक ह.भ.प. दिनेशजी महाराज औटी यांनी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता केली.