पावसाळापूर्व कामांसाठीची पाळणार डेडलाईन

पावसाळ्यातील संभाव्य आपत्तीः नवी मुंबई मधील सर्व प्राधिकरण सज्ज

नवी मुंबई ः येणाऱ्या पावसाळी कालावधीच्या अनुषंगाने ‘शहर आपत्ती व्यवस्थापन समिती'च्या बैठकीत ‘समिती'चे अध्यक्ष तथा महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी महापालिका क्षेत्रातील सर्व प्राधिकरणांनी आपापली पावसाळापूर्व कामे २५ मे पूर्वी पूर्ण करुन सज्ज राहण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने महापालिकेसह सर्वच प्राधिकरणांनी पावसाळापूर्व कामांना सुरुवात केली आहे. नवी मुंबई शहर समुद्र सपाटीपासून खालच्या पातळीवर वसलेले असल्याने ‘सिडको'ने शहर निर्मिती करताना भरतीचे पाणी काही काळापुरते साठवून ठेवण्यासाठी धारण तलाव (होल्डींग पॉँड) निर्माण केलेले आहेत. त्यामुळे पावसाळी कालावधीत शहरात पाणी साचण्यापासून सुरक्षा मिळते.

तरीही पावसाळ्यात काही वेळा अतिवृष्टी आणि मोठ्या उधाण भरतीची वेळ एकच झाल्यास शहरातील काही सखल भागामध्ये काही काळ पाणी साचून राहते, असा अनुभव आहे. त्याअनुषंगाने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी शहर अभियंता संजय देसाई यांच्यासह सीबीडी-बेलापूर, सेक्टर-१२ तसेच वाशी, सेक्टर-८ येथील होल्डींग पाँडना त्याचप्रमाणे तेथे असलेल्या पंप हाऊसला भेटी देऊन तेथील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. याप्रसंगी अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड, कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे, अजय संख्ये, सुनिल लाड आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सीबीडी-बेलापूर आणि वाशी या दोन्ही ठिकाणचे पंप हाऊस सिडकोकालीन जुने असून त्यांच्या इमारती जीर्णावस्थेत आहेत. त्यांचे नवीन बांधकाम करण्यासाठी महापालिकेमार्फत सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. त्यानुसार या दोन्ही ठिकाणी नवीन पंप हाऊस बांधण्यास ‘एमसीझेडएम'ची परवानगी प्राप्त झाली आहे. नवी मुंबई महापालिकेने याकरिता उच्च न्यायालयाकडे परवानगीसाठी रितसर अर्ज दाखल केला आहे. आगामी पावसाळी कालावधी लक्षात घेता उच्च न्यायालयाची मंजुरी प्राप्त करुन घेऊन पावसाळ्यानंतर लगेचच पंप हाऊस बांधण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

होल्डींग पॉँड भरतीचे पाणी शहरात घुसू न देता साठवून ठेवणारी आणि शहराची सुरक्षा राखणारी महत्वाचे ठिकाण आहे. तथापि, मागील अनेक वर्षात तेथील गाळ काढण्याची परवानगी न मिळाल्यामुळे त्याठिकाणी खारफुटीची वाढ झालेली आहे. वास्तविक पाहता नवी मुंबई शहराची भौगोलिक रचना लक्षात घेऊन सागरी नियंत्रण नियमावली अंतर्गत होल्डींग पाँड मधील गाळ काढण्याची परवानगी ‘एमसीझेडएम'मार्फत मिळावी याकरिता महापालिकेमार्फत सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.

सीबीडी-बेलापूर आणि वाशी या दोन्ही ठिकाणी होल्डींग पॉँड परिसराची पाहणी करताना खारफुटीला बाधा न पोहचता आणि ‘सीआरझेड'च्या नियमांचे उल्लंघन न करता यांत्रिकी पध्दतीने शक्य होईल तेवढा गाळ काढून होल्डींग पॉँडची पाणी साठवण क्षमता थोड्याफार प्रमाणात का होईना वाढविण्याच्या दृष्टीने तत्पर कार्यवाही करावी, असे निर्देश आयुक्त राजेश नार्वेकर यांनी यावेळी दिले. 

त्यासोबतच ‘एमसीझेडएम'कडून गाळ काढण्याची परवानगी प्राप्त करण्याचा पाठपुरावा सुरु ठेवावा, असेही आयुक्त नार्वेकर यांनी सूचित केले. भरतीच्या कालावधीत खाडीचे वाढलेले पाणी साठवून ठेवण्यासाठी होल्डींग पाँड काम करतात. त्यांच्या मुखाशी भरतीचे पाणी होल्डींग पाँडमध्ये घेण्यास आणि ओहोटीच्या कालावधीत होल्डींग पाँडमधील पाणी पुन्हा खाडीत सोडण्यास स्वयंचलित पलॅप गेटस्‌ लावण्यात आलेले आहेत. सदर पलॅप गेटस्‌ सुव्यवस्थितरित्या कार्यान्वित राहतील याकडे लक्ष देण्याच्या सूचना करीत आयुक्त राजेश नार्वेकर यांनी आवश्यक त्या ठिकाणी नवीन पलॅप गेटस्‌ लावून घ्यावेत, असेही निर्देशित केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबईत शासनाच्या जाहिरात धोरणाला तिलांजली