‘ऑक्सिपार्क'च्या निर्मितीने पनवेल शहराच्या सौंदर्यात आणखी भर  

‘कोशिश फाउंडेशन'च्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या ‘ऑक्सिपार्क'च्या निर्मितीने पनवेल शहराच्या सौंदर्यात आणखी भर

पनवेल ः ‘कोशिश फाउंडेशन'च्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या ‘ऑक्सिपार्क'च्या निर्मितीने पनवेल शहराच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. पनवेल शहरातील शहीद भोसले पेट्रोल पंपाजवळ कोशिश फाउंडेशन तर्फे उभारण्यात आलेल्या ‘ऑक्सिपार्क'चे उद्‌घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते २८ एप्रिल रोजी सायंकाळी करण्यात आले.

या कार्यक्रमास आमदार प्रशांत ठाकूर, ‘कोशिश फाउंडेशन'चे अध्यक्ष परेश ठाकूर, पनवेल शहर भाजप अध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक अनिल भगत, अजय बहिरा, राजू सोनी, प्रभाकर बहिरा, माजी नगरसेविका दर्शना भोईर, उद्योजक राजू गुप्ते, संजय जैन, ‘भाजप ओबीसी मोर्चा'चे रायगड जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयूरेश नेतकर, युवा नेते भारत ठाकूर, वैभव देशमुख, सुमित झुंझारराव, पनवेल शहर भाजप सरचिटणीस अमरिश मोकल, ‘कोशिश फाउंडेशन'चे खजिनदार अभिजित जाधव, सचिव ॲड. चेतन जाधव, उपाध्यक्ष मयुरेश नेतकर, सत्यवान नाईक, अभिषेक पटवर्धन, विक्रम कैय्या, सुदीप गायकवाड, प्रवीण पाटील, निशांत पावसकर आदी उपस्थित होते.
‘कोशिश फाउंडेशन'च्या ऑक्सिपार्कमुळे पनवेल शहराच्या सौंदर्यात भर पडली असून, नागरिकांना संध्याकाळी वेळ घालवण्यासाठी चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे, असे मत यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यवत केले.

‘कोशिश फाउंडेशन'च्या ऑक्सिपार्क उपक्रमातून प्रेरणा घेऊन अनेक संस्थांनी पुढे येऊन पनवेल शहरात असे उपक्रम राबविल्यास पनवेल शहराचे स्मार्ट सिटीत रुपांतर होण्यास वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.

 पूर्वी आम्ही किती वाईट आणि गरीब आहोत असे दाखवले की जास्त मदत मिळत होती. पण, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर स्मार्ट सिटी बनवण्यासाठी तुम्ही किती खर्च करणार ते सांगा, मग मदत देऊ असे त्यांनी सांगितल्याने आज सगळे काम करताना दिसत आहेत. पनवेल महापालिका झाल्याने विकासाला सुरुवात झाली. धानसर गावापासून ‘स्मार्ट सिटी'च्या कामाला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी चौक सुंदर झाला. वडाळे तलाव पनवेल शहराचे भूषण ठरत आहे. त्यामुळे लोकांना महापालिकेची ताकद समजली आहे, असे यावेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले.

ऑक्सिपार्क तयार करण्याचा उपक्रम महापालिका हद्दीत ‘एनजीओ'ने सुरू केला याचा अभिमान वाटत आहे. यामुळेच महापलिकेला शहर सौंदर्यीकरण आणि स्वच्छता स्पर्धा २०२३ मध्ये महाराष्ट्र राज्यात ‘ड' वर्ग महापालिका गटात प्रथम क्रमांक मिळण्यासाठी फायदा झाला, असे यावेळी महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले. कोशिश फाउंडेशन आणि राजू गुप्ते यांनी अजून काही जागा निवडून तेथे ऑक्सिपार्क तयार केल्यास २५ टक्के तुमचे आणि  महापालिका ७५ टक्के निधी देईल, असे महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी यावेळी जाहीर केले. त्याला होकार देऊन अजून दोन ठिकाणी ऑक्सिपार्क तयार करण्याची तयारी परेश ठाकूर आणि राजू गुप्ते यांनी दाखवली. पनवेल शहरातून जाणारा महामार्ग शाप ठरु नये, ध्वनी प्रदूषण, धूळ आणि उष्णतेपासून संरक्षण व्हावे म्हणून ऑक्सिपार्क तयार करण्याची संकल्पना मांडली आणि महापालिकेने त्याला परवानगी दिल्यावर अमिर गोकर्णा यांनी प्लान करून दिला. एका वर्षात ऑक्सिपार्क तयार करण्यात आला, असे प्रास्ताविकात परेश ठाकूर यांनी सांगितले. यावेळी ऑक्सिपार्क तयार करणाऱ्या योगेश महाजन यांचा सन्मान करण्यात आला.

पनवेल मधील पर्यावरणीय प्रगतीशील परिवर्तनाला चालना देण्यासाठी आणि सकारात्मक वातावरणीय बदल करण्यासाठी ‘कोशिश फाउंडेशन'च्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या ऑक्सिपार्क या आगळ्यावेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून आरोग्यदायी जीवनासाठी यशस्वी प्रयत्न केले आहेत. नागरिकांसाठी सामुदायिक पोषक जागा, शहराच्या विकासाबद्दल नागरिकांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे, शहराचे वाढते तापमान कमी करणे, तसेच ऑक्सिजनचे प्रमाण वाढविणे आणि पनवेल शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी ऑक्सिपार्क महत्त्वाचे ठरणार आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मानखुर्द ते बेलापूर या दहा किलोमीटर मेट्रो मार्गाची सिडको उभारणी करणार