दोन धूळ शमन यंत्र (डस्ट सप्रेशन मशीन) मनपाच्या ताफ्यात दाखल

धूळ शमन यंत्राद्वारे नवी मुंबई शहरातील धूळ प्रदूषणावर नियंत्रण

वाशी ः नवी मुंबई शहरात मागील काही दिवसांपासून धूळ प्रदूषणात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे धुळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि नवी मुंबई शहर धूळ मुक्त करण्यासाठी नवी मुंबई महापालिकाने केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शुध्द हवा कार्यक्रम अंतर्गत दोन धूळ शमन यंत्र (डस्ट सप्रेशन मशीन) घेतली आहेत. या यंत्राद्वारे रस्त्यावरील तसेच झाडांवरील धूळ साफ केली जात असून, सध्या प्रायोगिक तत्वावर या यंत्रांची चाचणी सुरु आहे.

नवी मुंबई शेजारी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम गतीमानतेने सुरु असून, त्याठिकाणी मोठया प्रमाणात निर्माण होणाऱ्या धुळीचा प्रतिकुल परिणाम आणि अतिरिक्त ताण नवी मुंबई शहरातील हवेवर पडत आहे. तसेच कॉरी आरएमसी प्लान्ट, पुनर्विकास कामात तोडल्या जाणाऱ्या इमारती आणि अवजड वाहनांमुळे पसरणारी धूळ, यामुळे मागील काही महिन्यांपासून नवी मुंबई शहरात धुळीचे प्रदूषण वाढले आहे. धूळ प्रदूषण वाढल्याने नवी मुंबई शहरातील शुध्द हवेचा दर्जा अतिशय खालावत चालला होता. खालावलेला हवेचा दर्जा मानवी आरोग्यास हानिकारक असल्याचे तज्ञांचे मत आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरातील वाढत्या धुळीचे प्रदूषण कमी करण्याच्या हेतूने नवी मुंबई शहर स्वच्छ हवा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने नवी मुंबई शहर धूळ मुक्त करण्यासाठी महापालिकाने केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शुध्द हवा कार्यक्रम अंतर्गत दोन धूळ शमन यंत्र (डस्ट सप्रेशन मशीन) मागवल्या आहेत. या यंत्राद्वारे रस्त्यावरील, दुभाजक, झाडांवरील धूळ साफ करण्यासोबत विविध कामे केली जातात.


सध्या दोन धूळ शमन यंत्रे मागवली असून, प्रायोगिक तत्वावर या यंत्रांची चाचणी सुरु आहे. त्यानंतर आणखी चार धूळ शमन यंत्रे मागवली जाणार आहेत, अशी माहिती महापालिका अतिरिक्त शहर अभियंता आणि पर्यावरण अधिकारी शिरीष आरदवाड यांनी दिली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

फ्लेमिंगो पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी