महाराष्ट्र भवन प्रत्यक्षात कधी आकार घेणार ?

नवी मुंबईतील महाराष्ट्र भवनाची विट कधी रचणार ?

नवी मुंबई -:नवी मुंबईतील वाशी सेक्टर ३० येथे सिडकोच्या माध्यमातून देशातील सर्व राज्यांना राज्य भवनसाठी जागा आरक्षित ठेवली होती.मात्र या ठिकाणी सर्व राज्यांची भवने  दिमाखात उभी असताना महाराष्ट्र भवनाची एक वीट सुध्दा रचली गेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र भवन प्रत्यक्षात कधी आकार घेणार असा सवाल आता  उपस्थित केला जात आहे.

नवी मुंबई  शहर उभारताना शहराला 'देशातील सर्व राज्ये समभाव' अशी ओळख देण्यासाठी सिडकोच्या वतीने, सर्व राज्यांना त्यांचे राज्य भवन उभारण्यासाठी वाशीमध्ये भूखंड दिले आहेत. त्यानुसार देशातील प्रत्येक राज्याने आपला सांस्कृतिक ठेवा प्रातिनिधिक स्वरूपात जपण्यासाठी येथे त्या त्या राज्यांच्या भवनांची उभारणी केली आहे. देशाच्या प्रत्येक राज्याची भवने या ठिकाणी दिमाखात उभी आहेत. मात्र येथे महाराष्ट्र भवनासाठी दिलेल्या भूखंडावर भवनासाठीचा अजून पायाही  खणला गेलेला नाही. त्यामुळे आपल्याच राज्यात महाराष्ट्र भवनाची वास्तू उभी राहू शकलेली नाही. सोमवारी साजऱ्या होणाऱ्या 'महाराष्ट्र दिनी' या भवनाची  कमतरता त्यामुळे जाणवणार आहे.

महाराष्ट्र भवनाच्या उभारणीसाठी १९९८ मध्ये आठ हजार चौरस मीटरचा भूखंड राखीव ठेवण्यात आला आहे. मात्र येथे आजतागायत महाराष्ट्र भवनाच्या इमारतीसाठी साधा पायाही खणला गेलेला नाही. या ठिकाणी महाराष्ट्र भवन उभारावे म्हणून विविध राजकीय पक्षांनी आंदोलने केलेली आहेत.तर बेलापुर च्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी मागील वर्षी आघाडी सरकार असताना मार्च मधील अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्र भवन उभारण्याची मागणी केली होती.यावर  तत्कालीन उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी नवी मुंबईतील महाराष्ट्र भवन साठी १०० कोटी रुपये दिले जातील असे आश्वासन दिले होते.मात्र  शासनाच्या वतीने आश्वासन देऊन देखील महाराष्ट्र भवनाची अजून एक विट रचली गेली नाही.त्यामुळे मागील २५ वर्षापासून आरक्षित असलेल्या भूखंडावर महाराष्ट्र भवन कधी उभे राहणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

नवी मुंबई शहरात आज सर्व राज्यांची भवने दिमाखात उभी आहेत.मात्र महाराष्ट्र राज्यातच भूखंड आरक्षित असून देखील मागील २५ वर्षांपासून महाराष्ट्र भवन उभे राहत नाही ही शोकांतिका आहे. - बाळासाहेब शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष, मनसे सहकार सेना.

 राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच अयोध्या दौरा केला.यावेळी त्यांनी उत्तर प्रदेश मध्ये महाराष्ट्र भवन उभारले जाईल अशी घोषणा केली.मात्र आपल्या कडे भूखंड उपलब्ध असून देखील त्यावर भवन उभारण्यास शासन स्तरावर कुठलीच हालचाल दिसत नाही .त्यामुळे शासनाने उत्तर प्रदेश मध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याआधी आपल्या कडे भवन उभारावे.- मनोज मेहेर, माजी ब प्रभाग समिती सदस्य,मनपा.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

दोन धूळ शमन यंत्र (डस्ट सप्रेशन मशीन) मनपाच्या ताफ्यात दाखल