कोकण विभागीय कार्यशाळेत स्वच्छता विचार मंथन

स्वच्छता कार्यवाही करताना शहराची बलस्थाने, कमतरता यांचा गांभिर्याने विचार व्हावा -आयुवत नार्वेकर

नवी मुंबई ः स्वच्छता आणि सुशोभिकरणाच्या अनुषंगाने चांगली कार्यवाही करताना आपल्या शहराची बलस्थाने तसेच कमतरता यांचा गांभिर्याने विचार करावा. तेथील भौगोलिक स्थिती, संस्कृती आणि मानसिकता यांचा अभ्यास करुन आपापली उत्तरे शोधावीत. नवी मुंबईत स्वच्छतेचे महत्व आधी अधिकारी, कर्मचारी यांना पटले, ते त्यांच्या मनात रुजले आणि त्यामुळे ते नागरिकांमध्ये प्रभावीपणे प्रसारित होऊ शकल्याचे अनुभव कथन करीत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी महापालिकेच्या स्वच्छ शहर म्हणून यशस्वी वाटचालीचा मागोवा घेतला.

महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाच्या वतीने स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० बाबत कोकण विभागीय आढावा बैठक आणि कार्यशाळा प्रसंगी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर मनोगत व्यक्त करीत होते. याप्रसंगी स्वच्छ महाराष्ट्र अभियान राज्य संचालक नवनाथ वाठ, कोकण विभागीय नगरपालिका प्रशासन उपायुक्त रविंद्र जाधव, महापालिका शहर अभियंता संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड व्यासपीठावर उपस्थित होते.
नगरविकास दिनाच्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी आपल्या मनोगतात मोठ्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी राबविलेल्या स्वच्छता आणि सुशोभिकरण उपक्रमांबाबत लहान स्थानिक स्वराज्य संस्थांना मार्गदर्शन करावे, असे सूचित केले होते. त्या अनुषंगाने या कार्यशाळेत स्वच्छता आणी सुशोभिकरणात क-वर्ग महापालिकांमध्ये राज्यात प्रथम क्रमांकावर असलेल्या नवी मुंबईने राबविलेल्या अभिनव उपक्रमांच्या अनुषंगाने आयुक्त राजेश नार्वेकर यांनी उपस्थितांशी सुसंवाद साधला.

स्वच्छता आणि सुशोभिकरणाविषयी कोणत्याही प्रकारे मार्गदर्शन करणार नाही तर या वाटचालीतले अनुभव सांगणार आहे असे स्पष्ट करीत आयुक्त राजेश नार्वेकर यांनी नवी मुंबईतील अधिकारी, कर्मचारी यांच्या मनात स्वच्छता संदेश रुजला आहे. त्यामुळे तो अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांनी केले असे सांगत लोकसहभाग वाढीसाठी स्वच्छता आणि सुंदरतेचे महत्व आधी कर्मचाऱ्यांना पटलेले हवे; मग काम करणे सोपे जाते, असा विचार मांडला.

एखाद्या शहरात यशस्वी झालेल्या चांगल्या गोष्टी दुसऱ्या शहरात यशस्वी होतीलच असे नाही तर शहरनिहाय योग्य उपाययोजना शोधण्याची गरज आहे. या अनुषंगाने नवी मुंबईच्या झोपडपट्टी क्षेत्रात राबविलेल्या झिरो वेस्ट स्लम मॉडेल, कोळीवाड्यांमध्ये राबविलेला फिश फेड प्रकल्प, सांडपाणी व्यवस्थापनात उद्याने, बांधकामे इतकेच नव्हे तर टर्शअरी ट्रिटमेंट प्लांटद्वारे एमआयडीसी क्षेत्रातील उद्योग समुह यांना प्रक्रियाकृत पाणी पुरवठा करुन पिण्याच्या पाण्याची केलेली बचत, स्वच्छतेइतकेच शहर सौंदर्यीकरणाला दिलेले महत्व आणि त्यातही राबविलेल्या विभागनिहाय अभिनव संकल्पना, सानपाडा उड्डाणपुलाखाली राबविलेली आनंद महिंन्द्रा यांनी टि्‌वट करून जगभरात पोहोचविलेली गेम्स झोन संकल्पना अशा विविध आगळ्यावेगळ्या प्रकल्पांविषयी आयुवत राजेश नार्वेकर यांनी उपस्थितांना माहिती दिली.

अशा सर्व गोष्टींमुळे सुशोभिकरणात नवी मुंबई एक ब्रँड झाला असून यामुळे शहरातील नागरिकांमध्ये अभिमानाची भावना निर्माण होऊन शहराविषयी प्रेम वाढीस लागले आहे. त्यामुळे कोणत्याही उपक्रमात नवी मुंबई महापालिकेला व्यापक लोकसहभाग मिळतो. नवी मुंबईत कुठेही ‘निश्चय केला' असे म्हटले की समोरचा माणूस ‘नंबर पहिला' असेच सहजपणे म्हणेल इतक्या व्यापक प्रमाणात स्वच्छतेचे महत्व जनमानसात रुजलेले आहे. तशाप्रकारे मोठ्या प्रमाणावर जनजागृती झालेली आहे, असे आयुवत नार्वेकर म्हणाले.
पद्मश्री शंकर महादेवन यांच्यासारखे जगप्रसिध्द व्यक्तीमत्व शहराविषयीच्या प्रेमातून कोणतेही मानधन न घेता ‘स्वच्छ नवी मुंबई मिशन'चे ब्रॅड ॲबेसेडर पद स्विकारते, शहर स्वच्छता उपक्रमात स्वतःहून सहभागी होते, हीच भावना इथल्या प्रत्येक नागरिकाची आहे. याकरिता प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेने आपापल्या शहराच्या क्षमता लक्षात घ्ोऊन आपली उत्तरे शोधावीत, असा सल्ला आयुवतांनी दिला.

 महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या वतीने ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२३'ला समर्थपणे सामोरे जाताना स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अतंर्गत ‘एकच लक्ष्य, शहरे स्वच्छ' असे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून संपूर्ण राज्यामध्ये विभागवार कार्यशाळांचे आयोजन केले जात आहे. या माध्यमातून स्वच्छता आणि सुशोभिकरणाचा संदेश, त्यावरील कार्यवाही सर्वदूर प्रसारित होणार आहे. याबाबत कोकण विभागीय आढावा बैठक आणि कार्यशाळेत माहिती देताना ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान'चे राज्य अभियान संचालक नवनाथ वाठ यांनी आपल्याला दिलेले लक्ष्य पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने संपूर्ण क्षमतेने काम करावे आणि सुरु असलेल्या कामांना गती द्यावी, असे सांगितले. या कार्यशाळेच्या माध्यमातून कोकण विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा परस्परांशी संवाद होऊन यामधून नव्या संकल्पना परस्परांना समजतील आणि त्यांच्यामार्फत त्याचा उपयोग आपापल्या शहरात होईल, असे वाठ यांनी सांगितले.

कोकण विभागीय नगरपालिका प्रशासन उपायुक्त रविंद्र जाधव यांनी राज्यात कोकण विभागाची कामगिरी सर्वात सरस असेल असे आपण सर्व मिळून समुह भावनेने काम करुया, असे आवाहन केले. नवी मुंबई महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात संपन्न झालेल्या सदर कार्यशाळेप्रसंगी कोकण विभागातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थेचे उच्च अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मनसे, सिडको, सोडतधारकांची बैठक यशस्वी