हापूस आवक मध्ये घट; निर्यातीवर मोठा परिणाम

हापूस आवक मध्ये घट; ऐन हंगामात केवळ १० % निर्यात 

वाशी ः कोकणातील हापूस आंब्याला देशासह परदेशात देखील मागणी वाढत चालली आहे. त्यामुळे मागणीनुसार वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ मार्केट मधून मोठ्या प्रमाणात हापूस आंबा निर्यात होतो. मात्र, यंदा एप्रिल महिन्यात कोकणातील हापूस आंब्याची आवक घटली आहे. याचा सर्वात मोठा परिणाम निर्यातीवर झाला असून, यंदा हापूस आंबा निर्यात १० % वर आली आहे. दरवर्षी सरासरी ७० %  ते ७५ % निर्यात होते. परंतु, यंदा अवघी १० %  हापूस आंबा निर्यात झाल्याने निर्यातदार हवालदिल झाले आहेत.

कोकणातील हापूस आंब्याला परदेशात मोठी मागणी असते. मात्र, यंदा हापूस आंब्याचे उत्पादन कमी झाल्याने बाजारात मागणीच्या तुलनेत पुरेसा हापूस आंबा दाखल होत नसल्याने त्याचा आखाती देशातील निर्यातीवर परिणाम होत आहे. आखाती देशात, लंडन, ऑस्ट्रेलिया, कुवेत मध्ये देवगड, रत्नागिरी, अलिबाग येथील हापूस आंब्याना अधिक प्रमाणात मागणी असते. १५ फेब्रुवारी नंतर टप्प्याटप्प्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड येथील हापूस आंबा एपीएमसी बाजारात दाखल होण्यास सुरुवात होते. परंतु, यंदा फेब्रुवारी अखेर अवकाळी पावसाच्या भीतीने वेळेआधीच आंबा बागायतदारांनी हापूस आंब्याची तोडणी करुन आंबा विक्रीसाठी बाजारात पाठवला. त्यामुळे यंदा फेब्रुवारी-मार्च मध्ये एकाच वेळी सर्व ठिकाणाहुन हापूस आंबा मोठया प्रमाणात बाजारात दाखल झाला होता. शिवाय दर देखील उतरले होते. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून ते दोन आठवड्यापर्यंत अवकाळी पावसाने कोकणाला २-३वेळा झोडपून काढले. त्यामुळे ऐन हंगामात हापूस आंब्याच्या झाडावर अवेळी पालवी फुटली. पालवी फुटल्याने आंब्याचे शोषण झाले असून, पुरेसे पोषण न मिळाल्याने आंबे गळ झाली. हेच आंबे एप्रिलमध्ये विक्रीसाठी दाखल होणार होते. अवकाळीने हाताशी आलेले उत्पादन वाया गेले. एप्रिल ते मे अखेर पर्यंत निर्यातीवर जोर असतो. मात्र, हापूस आंब्याच्या मुख्य हंगामातच मुबलक हापूस आंबा उपलब्ध नसल्याने मागील वर्षीच्या तुलनेत आता निर्यात देखील ६० टववयांनी कमी झाली आहे. मुबलक हापूस आंबा उपलब्ध होत नसल्याने यंदा ऐन हंगामात केवळ १० % निर्यात होत आहे. मागील वर्षी एप्रिल मध्ये ७० %  ते ७५ % निर्यात झाली होती, अशी माहिती हापूस आंबा निर्यातदारांनी दिली.

कोकणात फेब्रुवारी-मार्च महिन्यात वाढलेले तापमान आणि मार्च मध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे मोठी आंबा गळती झाली. त्यामुळे एप्रिलमध्ये दाखल होणाऱ्या हापूस आंब्यावर त्याचा परिणाम झाल्याने हापूस आंबा उत्पादन घटले आहे. त्यामुळे बाजारातील आवक घटल्याने निर्यातीसाठी आंबा उपलब्ध होत नसल्याने हापूस आंबा निर्यात कमी होत आहे. - चंद्रकांत मोकल, अध्यक्ष - महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

७५,५०० किंमतीचे १४६ डझन आंबे अन्न औषध प्रशासनाने केले  जप्त