कोकण भवन येथे छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती साजरी

 

छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा देशातील ऐक्यासाठी लढा - ना. रामदास आठवले

नवी मुंबई ः सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे, शिक्षणाशिवाय मनाचा विकास होत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षणाशी नाते होते. ते केवळ दलितांच्या मुक्तीसाठी लढले नाही, तर देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांचा लढा होता. तर छत्रपती शिवाजी महाराज मराठी माणासाला न्याय देण्यासाठी गनिमी काव्याने लढले. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशातील ऐक्य अबाधित ठेवण्यासाठी लढले होते, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री  रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव २५ एप्रिल रोजी कोकण भवन येथे साजरा करण्यात आला. त्यावेळी ना. आठवले बोलत होते. याप्रसंगी आमदार निरंजन डावखरे, ‘महा मुंबई मेट्रो'चे संचालक निखील मेश्राम, ‘आगरी-कोळी समाज शेतकरी प्रबोधिनी'चे अध्यक्ष राजाराम पाटील, कार्यक्रमाच्या अध्यक्षा समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे, नगररचना विभागाचे सहसंचालक जितेंद्र भोपळे, माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश धुमाळ, ‘स्माईल्स फाऊंडेशन्स'च्या संस्थापक-अध्यक्षा डॉ. उमा अहुजा, डॉ. धीरज अहुजा, आदि उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ दलितांच्या मुक्तीसाठी लढले नाही, तर समाजाला दिशा देण्यासाठी लढले. त्यांनी जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी काम केले. जातीपेक्षा देश मोठा आहे म्हणूनच देशासाठी लढा अशी भूमिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडली. आंबेडकरांनी दामोदर व्हॅलीत पाच धरणे बांधली. या मागील संकल्पना म्हणजे जलसाठे वाढविणे; जेणेकरुन जनतेचा, प्राणी, पशुपक्षांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, त्याचबरोबर जलसंधारण वाढेल. पाणीपत युध्दासाठी छत्रपती शिवाजी महाराज मावळे दिल्लीला घेऊन गेले आणि तेथे ते स्वराज्यासाठी लढले. त्यांनी देखील जाती व्यवस्थेला आळा घालण्याचे काम केले असल्याचे ना. आठवले यांनी यावेळी सांगितले. यावेळी आ.निरजंन डावखरे, राजाराम पाटील यांची देखील समायोचित भाषणे झाली. आ.डावखरे यांनी आमदार निधीतून डिजीटल लायब्ररीसाठी कोणी संस्था पुढे आल्यास त्या संस्थेस दहा लाख रुपये देण्याचे जाहिर केले. सदर कार्यक्रमात ना. रामदास आठवले यांच्या हस्ते आनंद गुप्ता, मृणाली राजपक्षे, राधा साफी, मिताली वाघे या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. ‘स्माईल्स फाऊंडेशन'च्या वतीने इयत्ता ४ थी ते १२ वी पर्यंतच्या गरजू विद्यार्थ्यांना बायजूजचे तीन वर्षा करिता मोफत सदस्यत्व देण्यात आले.

तत्पूव सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत मेडीकव्हर हॉस्पिटल खारघरच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. तर कार्यक्रमाच्या ठिकाणी ऐतिहासिक शस्त्रे आणि नाणी यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. नगररचना विभागाचे सहसंचालक जितेंद्र भोपळे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्‌घाटन करण्यात आले. तसेच संदीप जठारी यांनी काढलेली रांगोळी यावेळी आकर्षण ठरली.

सदर जयंती महोत्सव यशस्वी करण्यासाठी ‘समिोय'चे उपाध्यक्ष नरेश वाघमारे, सचिव प्रविण डोंगरदिवे, सहसचिव अजित न्यायनिर्गुणे, कोषाध्यक्ष मंगेश येलवे, खजीनदार अपर्णा गायकवाड, सदस्य वनिता कांबळे, मनोज राजपक्षे, विनोद वैदू, कमलेश वानखडे, बाळासाहेब मोगले, जनाबाई साळवे, बाबूराव बनसोडे आदिंनी विशेष परिश्रम घेतले.

सदर कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारीत झी वाहिनीवरील एक महानायक या हिंदी मालिकेचे दिग्दर्शक विनोद माणिकराव, या मालिकेत डॉ. बाबासाहेबांची मुख्य भूमिका साकारणारे अभिनेता अथर्व कर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती. अभिनेता कर्वे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारताना आलेले अनुभव सांगितले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एपीएमसी फळ बाजारात आग लागलेल्या ठिकाणी पुन्हा तेच अवैध व्यवसाय?