योग उपक्रमात पद्मश्री शंकर महादेवन यांच्या अचानक उपस्थितीने आनंदयोग

महापालिका तर्फे वाशी मध्ये स्वच्छताकर्मींसाठी योग शिबीर संपन्न

नवी मुंबई ः सेक्टर-२९, वाशी येथील राजीव गांधी उद्यान. सकाळी ७.३० ते ८ च्या दरम्यानची वेळ. नवी मुंबई महपालिकेच्या वतीने वाशी विभागातील स्वच्छतामित्रांसाठी ‘स्वच्छतेतून आरोग्य-आरोग्यसाठी योग' या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘सहजयोग मेडिटेशन' संस्थेचे योग प्रशिक्षक चंद्रशेखर खेरोडकर यांच्याकडून योगाचे धडे घेतले जात होते. महापालिकेच्या वतीने स्वच्छता मित्रांच्या आरोग्यपूर्ण जीवनासाठी राबविला जात असलेला अभिनव उपक्रम म्हणून आयुक्त राजेश नार्वेकर यांचीही याप्रसंगी आवर्जुन उपस्थिती. स्वच्छताकर्मींसमवेत आयुक्त आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे आणि इतर अधिकारी, कर्मचारीही उत्साहाने योगप्रशिक्षणात सहभागी झालेले. उद्यानाच्या निसर्गरम्य वातावरणात एकाग्र झालेले.अशावेळी अचानक उद्यानात मॉर्निंग वॉकसाठी आलेले पद्मश्री शंकर महादेवन सहज कुतुहल म्हणून सदर ठिकाणी काय चालले आहे ते बघण्यासाठी येतात, जरावेळ थांबून निरीक्षण करतात. आणि ‘स्वच्छ नवी मुंबई मिशन'चा ब्रँड ॲबेसेडरच प्रत्यक्ष तेथे योगायोगाने आलेला पाहून योग उपक्रमाचा माहौलच बदलून जातो.कोणताही अभिनिवेश न आणता पद्मश्री शंकर महादेवन योग शिबिराच्या दिशेने पुढे येतात आणि गर्दीत सहभागी होत आपुलकीने सगळ्यांना भेटतात. याप्रसंगी दोन शब्द बोलण्याची त्यांना विनंती केली जाते. तेही सहजपणे माईक हातात घेऊन उपस्थितांशी संवाद साधू लागतात.

उद्यानाच्या शेजारीच रहात असल्याने अधूनमधून उद्यानात चालण्यासाठी येत असतो. आज आलो तर उद्यानात गर्दी दिसली आणि माझा फोटो असलेले बॅनर दिसले. त्यामुळे पुढे येऊन पाहतो तर आपल्या स्वच्छताकर्मींचा योग कार्यक्रम सुरु असल्याचे दिसले आणि मग रहावले नाही. महापालिकेला आजवर राज्यात, देशात जे बहुमान लाभले त्यामध्ये सर्वात मोठा वाटा ऊन, पाऊस, थंडीची पर्वा न करता शहर स्वच्छतेसाठी झटणाऱ्या स्वच्छताकर्मींचा आहे. अशा आपल्या स्वच्छतामित्रांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने महापालिका योग शिबिर आयोजित करीत आहे, ती अत्यंत कौतुकास्पद गोष्ट असल्याचे शंकर महादेवन यावेळी म्हणाले.

योग शिबीराचे औचित्य साधून शंकर महादेवन यांनी स्वयंप्रेरणेने गायत्रीमंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर उद्यानातील सकाळचे प्रसन्न वातावरण ‘सूर निरागस हो' या अभिजात स्वरांनी भारुन गेले. कोणत्याही संगीत साथीशिवाय त्यांनी अंतःप्रेरणेने उजळलेला निरागस स्वर योगामुळे एकाग्र झालेल्या उपस्थितांच्या प्रफुल्लीत मनाला भावून गेला.
योगाचे महत्व निरोगी जीवनासाठी अत्यंत मोठे असून नवी मुंबई महापालिका आपल्या स्वच्छतामित्रांच्या आरोग्य जपणुकीसाठी योगाचा आधार घेऊन प्रत्येक विभागात योग शिबीर आयोजित करीत आहे. याआधी बेलापूर, नेरुळ आणि ऐरोली विभागांमध्ये अशा प्रकारची योग शिबीरे झाली असून आजच्या शिबिरात जगप्रसिध्द गायक, संगीतकार आणि ‘नवी मुंबई स्वच्छ मिशन'चे ब्रँड अँबेसेडर शंकर महादेवन यांची अकल्पित उपस्थिती सुखावणारी आणि प्रेरणादायी असल्याचे यावेळी आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सांगितले. महापालिकेच्या वतीने महिला स्वच्छताकर्मींसाठीही विभागाविभागात सभागृहामध्ये अशा प्रकारचे योग प्रशिक्षण उपक्रम राबविण्याचे नियोजन असल्याचे आयुक्त नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

अशाप्रकारे स्वच्छतामित्रांसाठी आयोजित ‘स्वच्छतेतून आरोग्य-आरोग्यासाठी योग' या उपक्रमात पद्मश्री शंकर महादेवन यांची योगायोगाने उपस्थिती आणि त्यांनी पारंपारिक योग प्रकारांना स्वरयोगाची दिलेली जोड सदर उपक्रमाला आनंदयोग बहाल करणारी ठरली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कोकण भवन येथे छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती साजरी