अवकाळी पाऊस आणि हवामान बदलाने हापूस आंब्याचे उत्पादन कमी

हापूस आंबा आवकमध्ये घट ; दरात वाढ

वाशी ः यंदा समाधानकारक पाऊस पडल्याने हापूस आंब्याचे उत्पादन चांगले असेल, अशी अपेक्षा हापूस आंबा उत्पादक शेतकऱ्यांना होती. मात्र, अवकाळी पाऊस आणि हवामान बदलाने हापूस आंब्याचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे फेब्रुवारी-मार्चमध्ये आवक जादा होती. मात्र, आता मुख्य हंगामात हापूस आंब्याची आवक घटली आहे. त्यामुळे मागील आठवड्याच्या तुलनेत हापूस आंब्याची प्रतिपेटी २००-५०० रुपयांनी महागली असून, ४-६ डझन पेटीला २२०० ते ५००० रुपये दर आहे.

वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ मार्केटमध्ये जानेवारी, फेब्रुवारी महिना सुरु होताच अवीट गोडी करता प्रसिध्द असलेला हापूस आंबा दाखल होण्यास सुरुवात होत असते. यावर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये  मोठ्या प्रमाणात हापूस दाखल झाल्यामुळे पुढील कालावधीत देखील हापूस आंब्याला सुगीचे दिवस येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, यावर्षी अवकाळी पावसाने हापूस आंब्याच्या पिकावर परिणाम झालेला आहे. मोठ्या प्रमाणात हापूस दाखल होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र, हवामान बदलाच्या वातावरणाने उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे यंदा आवक घटली  आहे. एप्रिलमध्ये हापूस आंब्याच्या मुख्य हंगामाला सुरुवात होत असते. एप्रिल-मे दरम्यान बाजारात मोठ्या प्रमाणावर हापूस दाखल होतो. परंतु, यंदा फेब्रुवारी-मार्चमध्ये आवक जास्त होती. तर आता पुन्हा आवक कमी होत आहे. २४ एप्रिल रोजी एपीएमसी बाजारात कोकणातील हापूस आंब्याच्या १८ हजार ५२६ पेट्या दाखल झाल्या. तर इतर राज्यातील २१ हजार ९४२ पेट्या दाखल झाल्या आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत हापूस आंब्याची आवक कमी झाली असून, त्यामुळे दर वधारले आहेत. आधी २-४डझनला २ हजार ते ४ हजार ५०० रुपये दर होता. परंतु, २४ एप्रिल रोजी २ हजार २०० ते ५ हजार रुपयांनी हापूस आंब्याची विक्री होत आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

योग उपक्रमात पद्मश्री शंकर महादेवन यांच्या अचानक उपस्थितीने आनंदयोग