एपीएमसी बाजारात आवक मध्ये घट

अवकाळी पाऊस आणि अतिउष्णतेमुळे भाज्यांचे उत्पादन कमी झाल्याने भाजीपाला दरात वाढ

वाशी ः अवकाळी पाऊस आणि अतिउष्णतेमुळे भाज्यांचे उत्पादन कमी झाल्याने भाज्यांच्या दर्जवरही त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) भाजीपाला मार्केटमध्ये २५ एप्रिल रोजी भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने दर वधारले असून, शिमला मिरची, वांगी, फरसबी, काकडी यांच्या दरात १० % ते १५ % वाढ झाली आहे.

एपीएमसी भाजीपाला बाजारात २५ एप्रिल रोजी ५९४ गाड्यांची आवक झाली असून, यामध्ये शिमला मिरची, फरसबी, वांगी आणि काकडी यांची आवक घटल्याने दर १० %  ते १५ % वाढले आहेत, अशी माहिती भाजीपाला व्यापाऱ्यांनी दिली. २५ एप्रिल रोजी एपीएमसी भाजीपाला बाजारात काकडी ३९२ क्विंटल, शिमला मिरची १४८२ क्विंटल, फरसबी ७६ क्विंटल, वांगी ३२३ क्विंटल, वाटाणा १०४५ क्विंटल आवक झाली आहे. टोमॅटो, गवार, भेंडी, कोबी, पलॉवर, गाजर यांचे दर स्थिर असून हिरवी मिरची, हिरवा वाटाणा यांचे दर उतरले आहेत, तर शिमला मिरची, वांगी, फरसबी, काकडी यांच्या दरात वाढ झालेली आहे.

आधी घाऊक बाजारात फरसबी प्रतिकिलो ४०-४५ रुपयांनी उपलब्ध होती. त्यामध्ये १० रुपयांची वाढ झाली असून, आता ५०-५५ रुपयांनी विक्री होत आहे. प्रतिकिलो शिमला मिरची आधी २०-२२ रुपये होती ती आता ३०-३२ रुपयांनी विकली जात आहे. प्रतिकिलो काकडी १२-१४ रुपयांवरुन १६-१८रुपये तर वांगी प्रतिकिलो १२ रुपयांवरुन आता १६ रुपयांनी विकली जात आहेत. एकंदरीत या भाज्यांची १० % ते १५ % दरवाढ झाली आहे. तर हिरवी मिरची आणि मटार यांचे दर मात्र घसरले आहेत. आधी वाटाणा प्रतिकिलो ८० रुपये होता तो आता ६० रुपयांवर उपलब्ध आहे तर हिरवी मिरची १६-२० रुपयांनी विक्री होत आहे, अशी माहिती एपीएमसी बाजारातील घाऊक भाजीपाला व्यापाऱ्यांनी दिली.


भाजीपाला दर
                         आता                    आधी
काकडी            १६-१८ रुपये       १२-१४ रुपये
शिमला मिरची     ३०-३२ रुपये       २०-२२ रुपये
फरसबी            ५०-५५ रुपये        ४०-४५ रुपये
वांगी                 १६ रुपये             १२ रुपये
हिरवी मिरची      १६-२० रुपये       २०-३० रुपये
वाटाणा             ६० रुपये            ८० रुपये

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अवकाळी पाऊस आणि हवामान बदलाने हापूस आंब्याचे उत्पादन कमी