शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
विमानोड्डाणाची डेडलाईन हुकण्याची शक्यता
विमानतळाच्या कामात दगडाचा अडसर
नवी मुंबई ः नवी मुंबई विमानतळ परिसरातील दगडखाणी गत १५ दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे या परिसरातील रेती, खडी, दगडांची ने-आण थांबली आहे. विमानतळ परिसरात असलेला हजारो टन दगड जोपर्यंत बाहेर काढला जात नाही, तोपर्यंत नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यास विलंब लागणार आहे. बंद दगडीखाणींमुळे नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाच्या कामाला बाधा निर्माण होत असताना देखील राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उरण-पनवेल परिसरातील दगडखाणी एकत्रित बंद करावयास लावणाऱ्या राजकारणी आणि नोकरशहा यांच्या सिंडीकेट विरोधात कुठलीच कारवाई करत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
गेल्या पंधरादिवसापासून उरण-पनवेल तालुक्यातील दगडखाणी तहसीलदारांकडून अचानक बंद करण्यात आल्या आहेत. त्यासाठी दगडखाणींची मुदत संपणे, कागदपत्रांची अपूर्तता, शासनाची रॉयल्टी न भरणे आदि कारणे सांगितली जात आहेत. परंतु, मुंबई, नवी मुंबई आणि पनवेल परिसरात रेती, खडी, भुसा आणि दगडाचा पुरवठा ज्या दगडखाणींमधून होतो त्या १०० हून अधिक दगडखाणी अचानक एकसाथ बंद झाल्याने नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांसह या व्यवसायावर पोट असणाऱ्या अन्य व्यावसायिकांना प्रश्न पडला आहे. तर दुसरीकडे दगडखाणी बंद असल्यामुळे नवी मुंबई विमानतळ क्षेत्रातील हजारो टन दगड बाहेर वाहून नेण्याचे काम अचानक थांबले आहे. १५ दिवसांपासून विमानतळ क्षेत्रातील दगड क्षेत्राबाहेर न पडल्याने विमानतळ क्षेत्रातील अर्धवट तोडलेले ओसाड डोंगर तसेच उभे राहिले आहेत. जोपर्यंत विमानतळ क्षेत्रातील डोंगर भुईसपाट होत नाहीत, तोपर्यंत नवी मुंबईतून विमानाचे उड्डाण शक्य नाही. डिसेंबर २०२४ पर्यंत नवी मुंबईतून विमानोड्डाण करण्याचे उद्दिष्ट सिडको आणि शासनाने डोळ्यासमोर ठेवले आहे. अशा परिस्थितीत विहित मुदतीत विमानतळ क्षेत्रातील दगड बाहेर काढला नाही तर नवी मुंबईतून विमानोड्डाणाची डेडलाईन हुकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महामुंबई क्षेत्रात एमएमआरडीए, एमएसआरडीसी, बुलेट ट्रेन, नॅशनल हायवे प्राधिकरणासह खासगी विकासकांची कोट्यावधीची कामे सुरु आहेत. यात रस्ते, उड्डाणपुल, मेट्रो, बोगदे, सागरी महामार्गांसह बंदरे आणि विमानतळाचा समावेश आहे. याशिवाय सिडको, म्हाडा सह खासगी विकासकांच्या टाऊनशिपची कामेही जोरात सुरु आहेत. या सर्व विकासकामांसाठी लागणारी विविध प्रकारची खडी, भुसा आणि दगड बहुतांश उरण, पनवेल परिसरातील दगडखाणींमधून पुरविला जातो.
त्यामुळे नवी मुंबईतील दगडखाणींच्या व्यवसायावर आता व्हाईटकॉलर माफियांची वक्रदृष्टी पडली आहे. या व्यवसायावर स्वतःची मोनोपोली निर्माण करण्यासाठी आणि बाजार भावापेक्षा आपल्या मर्जीप्रमाणे जास्त किंमत लावून बिल्डर्स, कंत्राटदार आणि शासकीय यंत्रणांची लुटमार करण्याचा उद्देश या माफियांचा दिसून येतो. त्याकरिता काही ठराविक राज्यकर्ते आणि नोकरशहांना हाताशी धरुन खडी-रेतीच्या क्षेत्रात आपले ‘स्वराज्य' निर्माण करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळेच उरण-पनवेल परिसरातील दगडखाणी गेल्या काही दिवसांपासून बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्याचा फटका आता नवी मुंबई विमानतळाच्या कामाला देखील बसला आहे.
ब्रिटीश राजवटीत लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहेअसे सांगून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढा उभा केला होता. मात्र, आज काही माफिया ‘स्वराज्य' नाव वापरुन रयतेची लूट करु इच्छित आहेत. त्यामुळे आता राज्य सरकारच्या भूमिकेकडे म्हणण्यापेक्षा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे दगडखाणींवर अवलंबून असलेल्या तमाम व्यावसायिक आणि नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.