शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
‘स्वच्छ भारत अभियान'ला सोसायटी मधील रहिवाशांचा हरताळ!
नवी मुंबई महापालिका ‘स्वच्छ भारत अभियान उपक्रम-२०२३' साठी सज्ज
तुर्भे ः घरातील खराब फर्निचरसह अन्य साहित्य सोसायटी लगतच्या पदपथ, रस्ते यांवर टाकून नवी मुंबई शहरात ‘स्वच्छ भारत अभियान'ला रहिवाशांकडून हरताळ फासण्याचा प्रकार होत आहे. या प्रकरणी नवी मुंबई महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
नवी मुंबई शहरात रहिवासी वस्त्यांजवळील गल्ल्या, पदपथ या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी घरातील डागडुजी केल्यानंतर उरलेला घनकचरा, टाकाऊ वस्तू, फर्निचर ठेवले जात आहेत. यामुळे अन्य लोक देखील त्या ठिकाणी येता-जाता कचरा टाकत आहेत. परिणामी या परिसरामध्ये दुर्गंधी देखील पसरत आहे. या ठिकाणी नियमितपणे स्वच्छ साफसफाईचे कामगार रस्ते सफाई करत असतानाही या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत. सदर काम आपले नसल्याचे काही कंत्राटदारांनी सांगितले.
नवी मुंबई महापालिका ‘स्वच्छ भारत अभियान उपक्रम-२०२३' साठी सज्ज झालेली आहे. यासाठी नागरिकांनीही त्यांचा सहभाग वाढावा म्हणून महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी वारंवार नागरिकांना आवाहनही केले आहे. त्याचबरोबर महापालिका घनकचरा विभागाच्या माध्यमातून रहिवाशी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करुन सोसायटीच्या सदस्यांचा कृतिशील सहभाग या अभियानामध्ये असावा अशी विनंती पत्र देखील पाठवले आहेत. मात्र, काही सोसायट्यांकडून या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर काही सोसायटी ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करणे, सोसायटीच्या आवारातील जागा स्वच्छ ठेवणे, सोसायटीची बॅकलेन स्वच्छ ठेवणे, त्याचबरोबर सोसायटीच्या आजूबाजूलाही जाताना कोणी कचरा करत असल्यास त्यांना समजावणे असे प्रकारही उत्स्फूर्तपणे अनेक सोसायटीतील नागरिकांकडून करण्यात येत आहेत. परंतु, काही नागरिकांकडून महापालिकेच्या स्वच्छता विषयक आवाहनाला केराची टोपली दाखवण्याचा प्रकार होत आहे. नेरुळ सेक्टर-८,१०, सारसोळे डेपो येथील तसेच तुर्भे सेक्टर-२१, यासह वाशी, सानपाडा, कोपरखैरणे, ऐरोली आदी भागातही हौसिंग सोसायटी जवळील गल्ल्या, पदपथ यांवर घरातील कचरा टाकून ठेवल्याचे प्रकार दिसत आहेत.