महापालिका तर्फे २०,०४७ विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्तीचा लाभ

नवी मुंबई महापालिका तर्फे २०,०४७ विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्तीचा लाभ

नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिका समाजविकास विभागाच्या वतीने इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विविध घटकांतील पात्र २०,०४७ विद्यार्थ्यांना सन २०२१-२२2 वर्षाची शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आलेली असून १५ कोटी ८१ लक्ष २० हजार रुपये इतकी रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याकरिता ‘स्टेट बँक ऑफ इंडिया'च्या महापालिका मुख्यालय शाखेत पाठविण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने बँकेमार्फत विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली आहे.

नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रामधील विविध घटकांतील इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सन २०२१-२२ आणि २०२२-२३ या वर्षासाठी शिष्यवृत्ती योजना जाहीर करण्यात आली होती. या दोन वर्षांच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी ३३ कोटी २५ लाख रुपयांची तरतूदही करण्यात आलेली आहे.

या शिष्यवृत्तीचा लाभ विद्यार्थ्यांना जलद मिळावा यादृष्टीने समाजविकास विभागाने कार्यवाही करण्याच्या महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांच्या नियंत्रणाखाली नियोजन करण्यात आले. दोन वर्षांसाठी प्राप्त ७१ हजारहून अधिक अर्जांची पडताळणी, छाननी असे काहीसे जिकरीचे काम विहित वेळेत करण्याच्या दृष्टीने समाजविकास विभागाचे उपायुक्त डॉ. श्रीराम पवार यांनी समाजसेवा अधिकारी सर्जेराव परांडे आणि इतर कर्मचाऱ्यांच्या सहयोगाने कालबध्द आखणी करुन त्याची अंमलबजावणी केली. त्यामुळेच सन २०२१-२२ ची २०,०४७ पात्र विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वितरण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.

शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेसाठी सन २०२१-२२ साठी ३४,३१८ तर सन २०२२-२३ या वर्षासाठी ३७,५५७ असे दोन वर्षांसाठी एकूण ७१,८७५ अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जांच्या नोंदणीचा अंतिम दिनांक २८ फेब्रुवारी २०२३ होता. इतक्या मोठ्या संख्येने प्राप्त अर्जांतून पहिल्या टप्प्यात ३१ मार्च पूर्वी सन २०२१-२२ ची शैक्षणिक शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना विहीत मुदतीत देण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवण्यात आले. याकरिता विभाग स्तरावर योजना प्रचार, प्रसाराचे काम करणाऱ्या सर्व समुहसंघटक यांना १ मार्च पासून बेलापूर भवन येथील समाजविकास विभागाच्या कार्यालयात संगणक, लॅपटॉप, नेट सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या. यानंतर प्राप्त अर्ज प़डताळणी कामाला समुहसंघटक आणि इतर कर्मचाऱ्यांमार्फत जोमाने सुरूवात करण्यात आली.त्याचीच परिणिती म्हणजे केवळ १५ दिवसात जलदगतीने अर्जांची छाननी करुन सन २०२१-२२ या वर्षासाठी २०,०४७ पात्र विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली. त्यांच्या बँक खात्यात १५ कोटी ८१ लाख २० हजार रुपये इतकी शिष्यवृत्ती रक्कम जमा करण्याकरिता त्या रक्कमेचा धनादेश ‘स्टेट बँक ऑफ इंडिया'कडे देण्यात आला. त्यानुसार शिष्यवृत्ती रवकम वितरण प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली.

दुसरीकडे प्रलंबित ३९०अर्ज दुरुस्तीसाठी लाभार्थ्यांना परत पाठविण्यात आलेले असून या संदर्भात त्यांना एसएमएस द्वारे कळविण्यात आलेले आहे. याशिवाय दुसऱ्या टप्प्यातील सन २०२२-२३ या वर्षाच्या शिष्यवृत्तीकरिता प्राप्त ३७,५५७ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्जांची पडताळणी देखील सुरु असून त्यापैकी २१,६७५ अर्जांची पडताळणी पूर्ण झालेली आहे. उर्वरित १५,८८2 अर्जांची छाननी लवकरच पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती समाजविकास विभागाचे उपायुक्त डॉ. श्रीराम पवार यांनी दिली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ॲड. सचिन शिंदे यांच्या वाढदिवशी ‘नवी मुंबई स्टुडन्टस्‌ ॲन्ड युथ फाऊंडेशन'चा उपक्रम