शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
बेकायदा ‘फुटबॉल टर्फ'चे काम बंद करण्याची तंबी
‘सिडको'ची ‘एनएमएसए'ला नोटीस; अन्यथा करारनामा रद्द करण्याचा इशारा
नवी मुंबई ः वाशी येथील ‘नवी मुंबई स्पोर्टस् असोसिएशन'च्या मैदानावर सुरु करण्यात आलेल्या ‘फुटबॉल टर्फ'च्या कामाला शेकडो सभासदांचा विरोध आहे. तसेच सदर काम ‘सिडको'ची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे करण्यात येत आहे. त्यामुळे ‘फुटबॉल टर्फ'चे काम तातडीने थांबविण्यात यावे, अशी तंबी ‘सिडको'च्या शहर सेवा विभागाने ‘नवी मुंबई स्पोर्टस् असोसिएशन'ला दिली आहे. जर काम थांबवले गेले नाही तर सिडकोबरोबर झालेला करारनामा रद्द करण्यात येईल, असाही इशाराही सिडको प्रशासनाने दिल्यामुळे ‘एनएमएसए'च्या सभासदांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ‘नवी मुंबई स्पोर्टस् असोसिएशन'च्या सध्या असलेल्या बास्केटबॉल क्रीडांगणावर सुमारे ८५ लाख रुपये खर्चून एस्ट्रो टर्फ तयार करण्याचा घाट कार्यकारिणीने घातला आहे. सदर कामाला क्लब मधील सदस्यांनी जोरदार विरोध केल्याने नव्याने निर्माण होत असलेले एस्ट्रो टर्फ वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. ‘एनएमएसए'मध्ये सध्या बास्केटबॉलचे मैदान असून ते बनवण्यासाठी सुमारे १५ लाख रुपयांचा खर्च आलेला आहे. मात्र, होऊ घातलेल्या ‘एस्ट्रो टर्फ'मुळे मैदान उखडावे लागणार असल्याने अगोदरचा १५ लाखांचा खर्च वाया जाणार आहेच; शिवाय दुसऱ्या ठिकाणी तो नव्याने तयार करण्यासाठी सुमारे दोन ते तीन पट अधिक खर्च येणार आहे. यामुळे सुमारे एक ते सव्वा कोटी रुपयांचा नाहक भुर्दंड ‘एनएमएसए'ला पडणार आहे. याला जबाबदार कोण? असा सवाल सवाल सदस्यांनी उपस्थित केला आहे. पाच वर्षांपूर्वी या मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे नॅचरल फुटबॉल ग्राऊंड तयार करण्यात आले आहे. त्यासाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा खर्च आला होता. सदर फुटबॉल मैदानासाठी सभासदांकडून प्रत्येकी ३ हजार रुपये घेण्यात आले होते. मात्र, या फुटबॉल मैदानाला अगदीच अल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे फुटबॉल मैदान म्हणजे हत्ती पोसण्यासारखे झाले आहे. या मैदानाची मशागत करण्यासाठी ‘एनएमएसए'ला दर महिन्याला साडे तीन ते चार लाख रुपये खर्च येतो. यामध्ये पाणी आणि विजेचा वापरही जास्त होत असल्याने बिलाच्या रवकमाही मोठ्या येतात.
काही महिन्यासाठी मुंबई एफसी क्लबने सदर मैदान भाडेतत्त्वावर घेतले होते. त्यामुळे तात्पुरता दिलासा मिळाला होता. परंतु, त्यांची मुदत संपल्याने ये रे माझ्या मागल्या अशी पुन्हा परिस्थिती कायम आहे. त्याचबरोबर फुटबॉल मैदानाला कार्यकारिणीच्या नाकर्तेपणामुळे सिडको आणि महापालिका यांचे अजुनही ना-हरकत प्रमाणपत्र न मिळाल्याने सदर ना-हरकत प्रमाणपत्रासाठी जो दंड आणि व्याज येणार आहे तो कोणी भरायचा? असाही सवालही निर्माण झाला आहे.
नव्याने होऊ घातलेल्या ‘एस्ट्रो टर्फ'मुळे जे क्लबचे सदस्य सकाळ, संध्याकाळ चालण्यासाठी येतात, व्यायाम करण्यासाठी येतात, त्यांनाही या टर्फमुळे अडथळा निर्माण होणार आहे. ‘एनएमएसए'मधील काही ठराविक सदस्यांच्या मनमानीपणामुळे सर्व सदस्य हवालदिल असून नव्याने होऊ घातलेल्या एस्ट्रो टर्फ आणि बास्केटबॉल मैदानासाठी नाहक लाखो रुपयाचा खर्च करण्यात येणार असून सदरचा सर्व खर्च योग्य ठिकाणी वापरावा, अशी सदस्यांची मागणी आहे.
सद्यस्थितीत ‘एनएमएसए'च्या मुख्य इमारतीला तडे गेलेले असून इमारतीत पावसाळ्यात गळतीचे मोठे प्रमाण आहे. गेल्या पंधरा वर्षापासून इमारतीला रंग तसेच देखभाल, दुरुस्ती न केल्याने मुख्य इमारतीमधील खोल्यांची अवस्था फारच दयनीय झाली आहे. स्विमिंग पूलची इमारतही नादुरुस्त आहे, टेनिस कोर्टची संरक्षक भिंत खचून पडलेली आहे, पाकर्िंगची दुरावस्था झाली आहे. अशी अनेक कामे प्रलंबित असताना नवीन एस्ट्रो टर्फ आणि बास्केटबॉल मैदानाच्या खर्चाच्या कामांच्या घाट ‘एनएमएसए'च्या काही ठराविक पदाधिकाऱ्यांनी घातल्याने ‘संस्था'च्या भवितव्याबद्दलच प्रशचिन्ह निर्माण होत आहे.
अशातच जवळपास आठ हजार सदस्य संख्या असलेल्या ‘नवी मुंबई स्पोर्टस् असोसिएशन'चे अध्यक्ष आमदार गणेश नाईक यांनी कोणालाच विचारात न घेता मोजक्याच चार ते पाच कमिटी सदस्यांच्या उपस्थितीत सदर दोन कामाचा शुभारंभ केल्याने त्यांच्या कार्यपध्दतीवर इतर सदस्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे नवीन होणाऱ्या एस्ट्रो टर्फ आणि बास्केटबॉल मैदानाला सर्वांनी विरोध केला असून आम्हाला विचारात, विश्वासात न घेता कार्यकारिणीचा असाच मनमानीपणा कायम राहिल्यास आम्हाला आंदोलनाचा पवित्रा
घ्यावा लागेल. असे ‘एनएमएसए'चे ज्येष्ठ सदस्य सुरेंद्र कोठारी सांगितले.
यासंदर्भात काही सदस्यांनी ‘सिडको'कडे केलेल्या तक्रारी नंतर ‘सिडको'ने सध्या सुरु असलेले काम बंद करण्यासाठी ‘एनएमएसए'ला नोटीस पाठविली आहे. क्रीडा संकुलने सिडको बरोबर केलेल्या कराराचा भंग होत असल्याचे या नोटिसीत म्हटले असून सदरचे काम त्वरित बंद करावे अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे फुलबॉल टर्फ सुरु होण्याआधीच या मैदानावर वादाचा सामना रंगला असून ‘एनएमएसए'चे अध्यक्ष गणेश नाईक यांच्या समोर एकप्रकारे आव्हान उभे राहिले आहे. असे असले तरीही सदर नोटिसला केराची टोपली दाखवून ‘फुटबॉल टर्फ'चे काम सुरुच ठेवल्याने सिडको ‘एनएमएसए'च्या कार्यकारणीवर कायदेशीर कारवाई करील का? असा सवाल व्यक्त होत आहे.