आंबा पिकवण्यासाठी इथेफॉन रासायनिक द्रव्याचा फवारणी स्वरुपात वापर ; धक्कादायक बाब समोर

झटपट आंबा पिकवण्यासाठी इथेफॉन रसायनाची फवारणी

वाशी ः फळे पिकवण्यासाठी इथेफॉन या रसायन पावडरचा पुडी रुपाने वापर करण्यास परवानगी असताना वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ मार्केटमध्ये आंबा पिकवण्यासाठी इथेफॉन या रासायनिक द्रव्याचा फवारणी स्वरुपात वापर करण्यात येते असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे झटपट आंबा पिकवण्याच्या नादात एपीएमसी फळ मार्केट मधील व्यापाऱ्यांनी नागरिकांच्या आरोग्याशी खेळ मांडला आहे.
हापूस आंब्याचा हंगाम सुरु होताच हजारो ग्राहक आंब्याची चव चाखायला आसुसलेले असतात. याच हंगामात वाशी मधील एपीएमसी फळ बाजार आवारात रोज हजारो आंब्याच्या पेट्या दाखल होत असतात. पेट्यांमध्ये आलेले आंबे लवकर पिकवण्यासाठी काही व्यापारी नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. कारण आंबे पिकवण्यासाठी व्यापारी थेट इथेफॉन या रासायनिक द्रव्याची फवारणी करत असल्याचे समोर आले आहे. एपीएमसी बाजार मध्ये फिरल्यावर व्यापारी सर्रासपणे या ‘स्प्रे'च्या माध्यमातून इथेफॉन फवारणी करताना आढळतात. या आधी आंबा पिकवण्यासाठी ‘कॅल्शियम कार्बोनेट'चा वापर होत होता. मात्र, कॅल्शियम कार्बोनेट आरोग्यास हानिकारक असल्याने त्यावर बंदी घालण्यात आली आहे. परंतु, आंबा पिकवण्यासाठी इथेफॉन पावडरचा वापर करण्यास काही अटी शर्तीसह परवानगी देण्यात आली आहे. त्यात ठराविक अंतरावरुन आंब्याशी या पावडरचा  थेट संपर्क न येता पुडी रुपाने वापर करणे बंधनकारक आहे. मात्र, एपीएमसी फळ बाजारातील व्यापारी थेट इथेफॉनच्या ‘स्प्रे'चा मारा आंब्यांवर करत आहेत. सदर रासायनिक द्रव्य इतके धोकादायक आहे की याची बॉटल देखील १ फूट खड्डा खोदून त्यात पुरण्यात यावी, अशी सूचना बॉटलवरील निर्देशात दिले आहे. या पार्श्वभूमीवर धोकादायक रसायन थेट आंब्यावर मारुन नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. याप्रकरणी मनसे आक्रमक झाली असून, इथेफॉन स्प्रे मारणाऱ्या व्यापाऱ्यांवर ‘एफडीए'ने कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.या प्रकरणी अन्न औषध प्रशासनाचे निरीक्षक योगेश डहाणे यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद लाभला नाही.
 

इथेफॉन वापरचे काय आहेत नियम

इथेफॉन पावडरचा वापर करताना ती फळाच्या प्रत्यक्षात संपर्कात न आणता एका आवरणात (पॅक) करुन ती आंबा पिकविण्यासाठी ठेवता येईल. त्यामध्ये फळे पिकविण्यासाठी फळ, फळाची जात, परिपक्वता यानुसार १०० पीपीएम (०.१ टक्के) इथिलिन गॅसचा रायपनिंग चेंबरमध्ये वापर करण्यास परवानगी आहे. त्याशिवाय नैसर्गिकरीत्या आंबे पिकविण्यासाठी प्राधान्य द्यावे, असा सूचना 'एफडीए'च्या अधिकाऱ्यांनी केल्या आहेत.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

हेल्पलाईनची माहिती-जनजागृतीसाठी सामाजिक न्याय - विशेष सहाय्य विभागाचे आदेश