नगरविकास विभागाकडून जितेंद्र भोपळे यांच्या कार्याचा गौरव

जितेंद्र भोपळे हिरोजी इंदुलकर क्षेत्रीय पुरस्काराने सन्मानित

नवी मुंबई ः नगरविकास दिनानिमित्त नगरविकास विभागाच्या वतीने देण्यात येणारा ‘स्वराज्य अभियंता हिरोजी इंदुलकर पुरस्कार-२०२३'चे वितरण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २० एप्रिल रोजी करण्यात आले. यावेळी क्षेत्रीय स्तरावरील पुरस्कार नगररचना विभागाचे कोकण विभागाचे सह-संचालक जितेंद्र लक्ष्मण भोपळे यांना प्रदान करण्यात आला.

राज्याच्या नगरविकास विभागाकडून गुणवंत अधिकारी आणि कर्मचारी यांना स्वराज्य अभियंता हिरोजी इंदुलकर पुरस्कार देण्यात येतो. सदर पुरस्कार वितरण सोहळा २० एप्रिल रोजी एनसीपीए येथे पार पडला. यावेळी मंत्रालय (खुद्द) ५ आणि क्षेत्रीय स्तर (तांत्रिक) १७ आणि क्षेत्रीय स्तर (अतांत्रिक संवर्ग) ८ असे एकूण ३० पुरस्कार प्रदान करण्यात आले.
राज्य सरकारने अनेक विकास प्रकल्पांना गती दिली आहे. यातून नागरिकांच्या सोयीचा महाराष्ट्र घडविण्यात येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनियुक्तीवर गेलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शहरा विषयी आस्था आणि जिव्हाळा ठेवून काम केले पाहिजे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुरस्कार वितरणप्रसंगी सांगितले.

कोकण विभागाचे सह-संचालक जितेंद्र भोपळे यांनी आपल्या आतापर्यंतच्या कार्यकाळात विधी मंडळ, आयटीपीसी, प्रादेशिक योजनेमधील आरेखनातील दुरुस्ती आदि ९६ प्रकरणांमध्ये केलेली कार्यवाही, महाराष्ट्र प्रादेशिक-नगररचना अधिनियमातील विविध कलमांतर्गत २० प्रकरणात शासनास मुदतीआदी सादर केलेले अहवाल, विविध न्यायालयीन प्रकरणांचा केलेला पाठपुरावा, कोकण विभागातील एकूण १४ नवीन नगरपरिषदा, नगरपंचायती, बिगर नगरपरिषदा क्षेत्रातील विकास योजना जीआयएस प्रणालीद्वारे तयार करण्याचे महत्त्वपूर्ण काम पार पाडले आहे.

तसेच रत्नागिरी आणि पालघर शाखा कार्यालयाचे तांत्रिक-आस्थापना विषय लेखापरीक्षण, कोकण विभागातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती, सह-संचालक तथा मुख्य नियोजनकार महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ या पदाचा अतिरिक्त कार्यभार, मुंबई-नागपुर समृध्दी महामार्गाच्या अनुषंगाने त्यांनी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाच्या कामाची दखल घेऊन नगरविकास विभागाने स्वराज्य अभियंता हिरोजी इंदुलकर गुणवंत पुरस्कार देऊन जितेंद्र भोपळे यांना गौरविले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाढत्या प्रदूषण विरोधात ‘प्रदूषण नियंत्रण मंडळ' ‘ॲक्शन मोड'वर