माथाडी कामगार, अन्य घटकांना रेल्वे यार्डात मिळणार आवश्यक सुविधा कामगार मंत्री सुरेश खाडे यांची सूचना

‘माथाडी युनियन'तर्फे कामगार मंत्री खाडे यांचे आभार

नवी मुंबई ः मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या विविध माल धक्क्यावरील माथाडी कामगार आणि अन्य घटकांसाठी विश्रांतीगृह, पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालय, प्लॅटफॉर्म-रस्ते दुरुस्ती, दिवाबत्तीची सोय आदि सुविधा तातडीने उपलब्ध करुन देण्याच्या सूचना राज्याचे कामगार मंत्री ना. सुरेश खाडे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिल्या. विविध रेल्वे यार्डात पिण्याच्या पाणी, विश्रांतीगृह, शौचालय, प्लॅटफॉर्म-रस्ते दुरुस्ती आदि सुविधांचा अभाव असून, त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ‘महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन'ने रेल्वे प्रशासन आणि कामगार मंत्री ना. सुरेश खाडे यांच्याकडे निवेदने सादर केली होती. त्याअनुषंगाने कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी मंत्रालयात २० एप्रिल रोजी संयुक्त बैठक आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी सदर सूचना केल्या.

सदर बैठकीस ‘महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन'चे अध्यक्ष एकनाथ जाधव, जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख, सेक्रेटरी कृष्णा पाटील, प्रशांत सणस, संजय चोरमले, कामगार विभागाच्या प्रधान सचिव वनिता सिंघल, कामगार आयुक्त सतीश देशमुख, सह-कामगार आयुक्त (माथाडी) व्ही. के. बुवा, ‘मध्य रेल्वे'चे सहाय्यक वाणिज्य प्रबंधक चंद्रकांत पगारे, मुंबई डिव्हीजनचे गुडस्‌ वाणिज्य निरीक्षक रामशंकर गुप्ता, चिफ कमिशनर व्ही. गोपी कृष्णा, जोगेश्वरी रेल्वे यार्डचे सीजीओ विश्वास गोसावी, ‘पश्चिम रेल्वे'चे निरीक्षक मनोज मिश्रा, ‘ग्रोसरी बोर्ड'चे चेअरमन बाळासाहेब वाघ, रेल्वे बोर्डाचे चेअरमन दिनेश दाभाडे, नागपूर सोलापूर विभागाचे सहाय्यक कामगार आयुक्त सु. म. गायकवाड, ‘नागपूर माथाडी मंडळ'चे अध्यक्ष राजदीप पूर्वसचिव एम. पी. मढवी, ‘पुणे बोर्ड'चे अध्यक्ष प्र. ब. जाधव, सहाय्यक कामगार आयुक्त स. र. तोटावार, ‘जळगाव माथाडी बोर्ड'चे अध्यक्ष चं. ना. बिराट, ‘ट्रान्सपोर्ट बोर्ड'चे सचिव सुर्यकांत डोबरियाल, आदि उपस्थित होते.

विविध रेल्वे यार्डात माथाडी कामगार आणि अन्य घटकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात सदर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. चर्चेनंतर रेल्वे यार्डात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध होण्याकरिता रेल्वे प्रशासन आणि संबंधितांनी तातडीने कार्यवाही करावी. जेणेकरुन माथाडी कामगार आणि अन्य घटकांचे सुरु असलेले हाल संपुष्टात येतील. त्याचबरोबर रेल्वे यार्डातील क्लिअरींग एजंट कडून माथाडी कामगारांच्या कामाची लेव्हीसह मजुरी बोर्डात भरणा होण्याबद्दल लेव्हीसह मजुरी वसूल करण्याबद्दल माथाडी बोर्डांनी कारवाई करण्याच्या सूचना देखील ना. सुरेश खाडे यांनी दिल्या.

दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून विविध रेल्वे यार्डातील माथाडी कामगार आणि अन्य घटकांना आवश्यकत्या सुविधा उपलब्ध होण्याकरिता ‘महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन'ने रेल्वे प्रशासन, कामगार मंत्री यांच्याकडे मागणी केलेली आहे. त्यासंदर्भात कामगार मंत्री ना.सुरेश खाडे यांनी संयुक्त बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या सुचनांबद्दल ‘युनियन'चे नेते माजी आमदार नरेंद्र पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांनी आभार व्यक्त केले आहेत.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नगरविकास विभागाकडून जितेंद्र भोपळे यांच्या कार्याचा गौरव