‘अग्निशमन सेवा सप्ताह'निमित्त विविध उपक्रमांद्वारे व्यापक जनजागृती

महापालिकेच्या ५ अग्निशमन केंद्रांमार्फत प्रात्यक्षिकांसह मॉकड्रील

नवी मुंबई ः १४ एप्रिल या अग्निशमन सेवा दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महापालिका अग्निशमन दलाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. अग्निशमन दिनापासून म्हणजेच १४ एप्रिल पासून २० एप्रिल पर्यंत ‘अग्निशमन सेवा सप्ताह'चे आयोजन करुन नागरिकांमध्ये अग्निसुरक्षेविषयी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात आली.
अग्निशमन विभागाचे प्रमुख तथा अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्या नियंत्रणाखाली विभागीय अग्निशमन अधिकारी पुरुषोत्तम भोईर आणि त्यांच्या सहकार्यांनी उत्तम नियोजन करुन जनजागृतीपर उपक्रमांचा कृती आराखडा तयार केला होता. या अनुषंगाने १४ एप्रिल पासून ३ दिवस वाशी अग्निशमन केंद्रात अग्निशमन दलाकडील विविध उपकरणे आणि सुरक्षा साहित्याचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. या प्रदर्शनाला शेकडो नागरिकांनी भेट देत अग्निशमन दलाकडील वेगळ्या प्रकारच्या उपकरणांची आणि साहित्यांची पाहणी करीत माहिती जाणून घेतली.

‘अग्निशमन सेवा सप्ताह'निमित्त नागरिकांमध्ये अग्निसुरक्षेची जाणीव जागृती व्हावी यादृष्टीने महापालिका क्षेत्रातील विविध विभागात अग्नि विमोचनाची तसेच आग लागूच नये म्हणून बाळगावयाच्या खबरदारीची माहिती प्रात्यक्षिकांसह देण्यात आली.

प्रात्यक्षिकांसह झालेल्या मॉकड्रील नवी मुंबई महापालिकेच्या ५ अग्निशमन केंद्रांमार्फत आपापल्या विभागात वर्दळीच्या आणि महत्वाच्या ठिकाणी घ्ोण्यात आल्या. यामध्ये इनऑर्बिट मॉल, फोर्टीज्‌ हॉस्पिटल, बीआरसीए ब्राईड तुर्भे (डिपार्टमेंट ऑफ ॲटोमिक एनर्जी), सीवुडस्‌ मॉल, अलकनंदा सोसायटी, नेरुळ रेल्वे स्टेशन परिसर, सीबीडी-बेलापूर रेल्वे स्टेशन परिसर, डी-मार्ट सीवुडस्‌, महापालिका शाळा सेक्टर-८ सीबीडी-बेलापूर, माता-बाल रुग्णालय बेलापूर गांव, लायन्स हॉस्पिटल सेक्टर-७ कोपरखैरणे, डी-मार्ट सेंक्टर-१० ऐरोली, ओजस सोसायटी सेवटर-२० ऐरोली, लिटील एन्जल फाऊंडेशन सेक्टर-१४ ऐरोली अशा शहराच्या विविध भागातील विविध प्रकारच्या संस्था, परिसर, सोसायट्या, रुग्णालये, रेल्वे स्टेशन, मॉल अशा विविध ठिकाणी अग्नि सुरक्षेची प्रात्यक्षिकांसह मॉकड्रील करण्यात आली. या प्रात्यक्षिकांमध्ये उपस्थितांपैकी काही जणांना प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी करुन घेण्यात आले.  

सदर सर्वच ठिकाणी नागरिकांची उत्सुकतेने मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ‘अग्निशमन सेवा सप्ताह'च्या अनुषंगाने वेगवेगळ्या ठिकाणी अग्निसुरक्षेविषयी नागरिकांमध्ये करण्यात आलेल्या जनजागृतीचे चांगले उपक्रम यापुढील काळातही सुरु ठेवावेत अशा सूचना महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी अग्निशमन विभागास दिल्या. नागरिकांनीही आग लागूच नये आणि आपत्ती उद्‌भवू नये यादृष्टीने आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी केले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

माथाडी कामगार, अन्य घटकांना रेल्वे यार्डात मिळणार आवश्यक सुविधा कामगार मंत्री सुरेश खाडे यांची सूचना