‘शहर सौंदर्यीकरण-स्वच्छता स्पर्धा ‘क' वर्ग महापालिकांच्या गटात नवी मुंबई महपालिकेला राज्यात प्रथम

शहर स्वच्छता-सौदर्यीकरण मध्ये नवी मुंबई, पनवेल राज्यात नंबर वन क-वर्ग महापालिकांमध्ये नवी मुंबई प्रथम

नवी मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘शहर सौंदर्यीकरण-स्वच्छता स्पर्धा २०२२' मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ‘क' वर्ग महापालिकांच्या गटात नवी मुंबई महपालिकेला राज्यात प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबईतील एनसीपीए सभागृहात नगरविकास दिनाचे औचित्य साधून आयोजित विशेष समारंभात मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सदर राज्यस्तरीय मानाचा पुरस्कार स्विकारला. याप्रसंगी व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, शिक्षणमंत्री दिपक केसरकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी, मुंबई महापालिका आयुवत इवबाल चहल, प्रधान सचिव नगरविकास (२) सोनिया सेठी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी नवी मुंबई महापालिकेला प्रथम क्रमांकाचे प्रशस्तीपत्र आणि १५ कोटी रुपये पारितोषिक रक्कमेचा धनादेश प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार स्विकारताना आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, शहर अभियंता संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे उपस्थित होते.

स्वच्छ सर्वेक्षणामध्ये नवी मुंबई महानगरपालिका नेहमीच राज्यात अग्रभागी राहिली असून ‘स्वच्छ सर्वेक्षण 2022” मध्ये ‘राज्यात प्रथम” व ‘”देशात तृतीय” क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान नवी मुंबई महानगरपालिकेने
प्राप्त केलेला आहे. त्याचप्रमाणे कचरामुक्त शहरांच्या कॅटॅगरीमध्ये नवी मुंबईने ‘फाईव्ह स्टार रँकींग” प्राप्त केलेले असून ओडीएफ कॅटॅगरीमध्ये सर्वोच्च ‘वॉटरप्लस” मानांकन नवी मुंबईने प्राप्त केलेले आहे. विशेष
म्हणजे ही मानांकने प्राप्त करणारे नवी मुंबई हे राज्यातील एकमेव शहर आहे. ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२२'ला सामोरे जाताना स्वच्छतेप्रमाणेच शहर सुशोभिकरणाकडे नवी मुंबई महापालिकेने विशेष लक्ष दिले. शहर
सुशोभिकरणाच्या अत्यंत अभिनव आणि आगळ्यावेगळ्या संकल्पना राबविण्यात आल्या. येता-जाता सहजपणे दृष्टीस पडेल अशाप्रकारे शहराचे रुप अधिक आकर्षक दिसावे, शहराचे वैविध्य जपले जावे तसेच सुंदर दृश्यात्मक साज लाभावा यादृष्टीने महापालिका क्षेत्रात ठिकठिकाणी भित्तीचित्रांद्वारे, टाकाऊपासून टिकाऊ शिल्पाकृतींद्वारे, आकर्षक कारंजांद्वारे, चित्रकविता भिंतींद्वारे अत्यंत लोभस आणि लक्षवेधी रुप देण्यात आले.

नवी मुंबईचे स्वरुप आकर्षित करणारे आणि लक्षवेधी झाले असल्याने मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुलाखतीत नवी मुंबईच्या शहर सुशोभिकरणाचा कौतुकाने उल्लेख केला. परदेशात गेल्यानंतर तेथील स्वच्छतेप्रमाणेच सुंदरतेनेही आपण प्रभावित होतो. त्या धर्तीवर सुशोभिकरणाच्या नवनव्या संकल्पना जे.जे., रचना संसद अशा कला महाविद्यालयातील विद्यार्थी चित्रकारामार्फत राबविण्यात आल्या. त्यामुळे नवी मुंबई शहराचे रुपच बदलून गेले. काही भित्तीचित्रे तर घरी फोटोफ्रेम करुन लावावीत, स्क्रीन सेव्हर ठेवावीत इतकी दर्जेदार असल्याचे अभिप्राय नागरिकांकडून उत्स्फुर्तपणे मिळाले. शहर सुशोभित केल्याने परिसर सुंदर दिसतो आणि यामधून शहराविषयी सकारात्मक भावना तयार होते, असेही नागरिकांकडून सांगण्यात आले. नवी मुंबई शहरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या भिंती, अंडरपासच्या बाजुच्या भिंती, सोसायटीच्या भिंती, सरकारी इमारतींच्या भिंती, पाण्याच्या मोठ्या जलवाहिन्या यावर आकर्षक चित्रे रेखाटण्यात आली. सदर भित्तीचित्रे साकारताना येथील मूळ आगरी-कोळी संस्कृतीला प्राधान्य देण्यात आले. तसेच परिसराला साजेशी अनुरुप चित्रे काढण्यावर भर देण्यात आला. त्यानुसार शाळा-महाविद्यालय याबाहेरील भिंती शिक्षणाशी संबंधित विषय घ्ोऊन रंगविण्यात आल्या. उद्यानाजवळील भिंती खेळ आणि पर्यावरणाच्या संदेश देणारे चित्रांनी तर रुग्णालयाजवळील भिंती स्वच्छता आणि आरोग्य सेवा यासंबंधी जाणीव करुन देणारी चित्रे रेखाटून सजविण्यात आल्या. यामधील अनेक चित्रे कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या आगळ्या-वेगळ्या सृजनशील संकल्पनांमुळे अत्युच्च कलाविष्कार प्रदर्शित करणारी ठरली आहेत. अनेक ठिकाणी त्रिमितीय संकल्पना अर्थात थ्रीडी पेंटींग आश्चर्याचा सुखद धक्का देतात. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याच्या आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी