भूखंड अभावी दारावे ग्रामस्थ सामाजिक सुविधांपासून वंचित

दारावे ग्रामस्थ सामाजिक सुविधांपासून वंचित

तुर्भे ः दारावे गावामध्ये कार्यक्रमासाठी समाज मंदिर, सांस्कृतिक भवन, महिला मंडळासाठी भवन, जेष्ठांसाठी विरंगुळा केंद्र, खेळण्यासाठी मैदान यासाठीचे भूखंड सिडकोकडून मिळाले नाही. नवी मुंबई महापालिका स्थापन होऊन २८ वर्षे झाली तरी दारावे ग्रामस्थ सामाजिक सुविधांपासून वंचित आहेत.

नवी मुंबई शहर वसविण्यासाठी प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी कवडीमोल भावात घेतल्या तेव्हा समाज मंदिर, सांस्कृतिक भवन, महिला मंडळासाठी भवन, जेष्ठांसाठी विरंगुळा केंद्र, खेळण्यासाठी मैदान या समस्या सोडविण्याची सर्व जबाबदारी ‘सिडको'ची असल्याचे लिखित आश्वासन ‘सिडको'ने दिले होते. पण, सद्यस्थिती पाहता ‘सिडको'चे लिखित आश्वासन हवेत विरुन गेल्याची भावना दारावे ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. ज्या भूमीपुत्रांच्या जमिनीवर आज नवी मुंबई शहर उभे राहिले आहे, त्याच भूमिपुत्रांना त्यांच्या न्याय हक्कासाठी स्मशानभूमी बाहेर ग्रामसभा घ्यावी लागली आहे. ‘सिडको'ने नवी मुंबई शहर वसवताना गावांचा तसूभरही विचार न केल्याने दारावे गावातील ग्रामस्थांना नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागले आहे.

दारावे गावात मैदान, मासळी बाजार, सांस्कृतिक भवन, समाज मंदिर, विरंगुळा केंद्र नाही. त्यामुळे दारावे ग्रामस्थांना सांस्कृतिक कार्यक्रम किंवा इतर काही कार्यक्रम करण्यासाठी खाजगी हॉल भाड्याने घ्यावा लागत आहे. मागील अनेक वर्षापासून सांस्कृतिक भवन, समाज मंदिर, विरंगुळा केंद्र या समस्या दारावे ग्रामस्थांना भेडसावत आहेत. दारावे ग्रामस्थांच्या मागण्यांकडे सिडको आणि नवी मुंबई महापालिका प्रशासनाचे  लक्ष वेधण्यासाठी चक्क दारावे गावातील स्मशानभूमीत ग्रामसभा घेण्याचे ठरवण्यात आले होते. मात्र, महापालिकेने स्मशानभूमीला कुलुप लावून ठेवले होते. त्यामुळे दारावे ग्रामस्थांनी शंकर मंदिराच्या मोकळ्या जागेत एका झाडाखाली ग्रामसभा घेऊन प्रशासनाचा निषेध केला. यावेळी ग्रामदेवतेच्या जागेवर समाज मंदिर होणार असताना त्यावर भूमाफियांकडून होत असलेले अतिक्रमण त्वरित काढावे, अशी मागणी करण्यात आली. याविषयी स्थानिक नगरसेवक यांनी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

दरम्यान, सार्वजनिक सुविधांसाठीच्या मागण्या मान्य न झाल्यास सिडको आणि नवी मुंबई महापालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल, अशी चेतावणी यावेळी ‘दारावे ग्रामस्थ मंडळ'चे अध्यक्ष गणेश पाटील यांनी दिली. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या ताब्यातील भूखंडावर वाणिज्य वापरास परवानगी