नवी मुंबई मेट्रोची रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून तपासणी 

लवकरच बेलापूर ते पेंधर नवी मुंबई मेट्रो धावणार  

नवी मुंबई : गत बारा वर्षापासून विविध कारणांमुळे रखडलेला नवी मुंबई मेट्रोचा प्रवास अखेर दृष्टीपथात आला आहे. बेलापूर ते पेंधर दरम्यानच्या मार्गाचे काम पूर्णत्वास आल्यामुळे  बेलापूर ते पेंधर दरम्यान सोमवारपासून एकूण चार दिवस (१७ ते १९ एप्रिल व २५ एप्रिल)  मेट्रो मार्गाची तपासणी रेल्वे सुरक्षा आयुक्त विभागाकडून केली जाणार आहे. सदर मेट्रो मार्ग प्रवासासाठी सुरक्षित असल्याचे अंतिम प्रमाणपत्र सीएमआरएसकडून प्राप्त झाल्यानंतर  मेट्रो सेवेचे उद्घाटन लवकरात लवकर करण्याचा सिडकोचा मानस आहे.
सोमवारी रेल्वे सुरक्षा आयुक्त विभागाचे आयुक्त आर. के. शर्मा यांनी आपल्या 30 जणांच्या पथकासह मेट्रो स्टेशन-१, २ व ३ (बेलापूर ते बेलपाडा दरम्यान ) ची संपुर्ण तपासणी केली. सकाळी साडेनऊपासून तपासणीच्या कामाला सुरुवात होऊन संध्याकाळी उशीरापर्यंत तपासणीचे काम सुरू होते. रेल्वे सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सिव्हील स्ट्रक्चर्स, ट्रक, सिस्टीम ऍण्ड ट्रान्सपोर्ट कम्युनिकेशन, लिफ्ट्स व एस्कलेटर्स आणि सुरक्षा व्यवस्थेची तपासणी केली. यावेळी महामेट्रो व सिडकोचे अधिकारी त्यांच्यासमवेत उपस्थित होते. तर मंगळवारी खारघर परिसरातील स्टेशन क्र. ४, ५ व ६ ची तपासणी रेल्वे सुरक्षा अधिकाऱ्याकडून करण्यात आली.  

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर दळवळणाच्या सक्षम यंत्रणा निर्माण करण्यासाठी सिडकोने नवी मुंबई मेट्रोची योजना आखली आहे. याअंतर्गत चार टप्प्यात नवी मुंबईत मेट्रोचे जाळे विणले जाणार आहे. परंतू बेलापूर ते पेंधर हा ११ किमी लांबीचा पहिलाच टप्पा विविध कारणांमुळे दिर्घकाळ रखडला आहे. असे असले तरी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी या प्रकल्पाला गती देण्यासाठी कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून या प्रकल्पाची संपूर्ण जबाबदारी महामेट्रोवर सोपविण्यात आली आहे.  

मेट्रो स्टेशन उभारणाऱ्या कंत्राटदारांनी दोन वेळा काम अर्धवट सोडल्यामुळे बेलापूर ते पेंधर या पहिल्या टप्प्याचे दोन टप्प्यात विभाजन करण्यात आले. त्यापैकी पेंधर ते खारघर (सेंट्रल पार्क ) दरम्यानच्या ५.१४ किमी मार्गाचे काम गेल्या वर्षीच पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे या मार्गाची तपासणी झाल्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी या मार्गावर मेट्रो सेवा सुरू करण्याची परवानगी सिडकोला दिली आहे. मात्र उद्घाटन अभावी या मार्गावरील प्रवासही रखडला आहे.  

याच दरम्यान सिडकोच्या निर्देशानुसार महा मेट्रोने खारघर ते बेलापूर या उर्वरित मार्गाचेही काम पूर्ण केले आहे. तसेच या टप्प्यातील चार स्थानकांचे कामही पूर्ण झाले आहे. त्यानुसार १७ एप्रिलपासून बेलापूर ते पेंधर या संपूर्ण मार्गाची रेल्वे सुरक्षा विभागाकडून अंतिम तपासणी घेतली जाणार आहे. रेल्वे सुरक्षा विभागाचे प्रमाणपत्र प्राप्त होताच लवकरात लवकर बेलापूर ते पेंधर ही पहिल्या टप्प्यातील सेवा प्रवाशांसाठी खुली केली जाणार असल्याचे सिडको अधिकाऱयांनी स्पष्ट केले.  

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

भूखंड अभावी दारावे ग्रामस्थ सामाजिक सुविधांपासून वंचित