नवी मुंबई स्पोर्ट्स क्लबमध्ये एस्ट्रो टर्फ उभारणीवरून वादाची ठिणगी

एस्ट्रो टर्फ मैदान उभारणीला सदस्यांचा विरोध

नवी मुंबई : नवी मुंबई असोसिएशनच्या सध्या असलेल्या बास्केटबॉल क्रीडांगणावर सुमारे ८५ लाख रुपये खर्च करुन फुटबॉलसाठी एस्ट्रो टर्फ तयार करण्याचा घाट घालण्यात आला आहे. पाच वर्षांपूर्वी पार पडलेल्या फिफा अंडर-१७ स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना वाशी येथील एनएमएसए संकुलात फुटबॉलचे मैदान यापूर्वीच बनविण्यात आले आहे. त्यात पुन्हा एस्ट्रो टर्फ फुटबॉलचे मैदान तयार करण्याची तीव्र इच्छा एनएमएसए क्लबमधील ठराविक सदस्यांची होऊन त्यांनी एस्ट्रो टर्फच्या कामाला सुरुवात देखील केली आहे. परंतु, या मैदानाची गरज नसून क्लब मधील सदस्यांनी या कामाला तीव्र  विरोध दर्शविल्याने एस्ट्रो टर्फ मैदान उभारणीचे काम वादात सापडले आहे.

एनएमएसए संकुलात सद्यस्थितीत असलेले बास्केटबॉलचे मैदान बनवण्यासाठी १५ लाखाचा खर्च करण्यात आला होता. त्यामुळे याच बास्केटबॉल मैदानाच्या जागी एस्ट्रो टर्फ उभारावयाचे झाल्यास बास्केटबॉलचे मैदान उखडावे लागणार आहे. तसेच एस्ट्रो टर्फ उभारण्यासाठी सुमारे १ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच बास्केटबॉलचे मैदान नवीन ठिकाणी तयार करण्यासाठी सुमारे १५ ते २० लाखाचा पुन्हा खर्च करावा लागणार आहे. पाच वर्षांपूर्वी एनएमएसए मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे नॅचरल फुटबॉल ग्राउंड तयार करण्यात आले आहे. त्यासाठी सुमारे पाच कोटीचा खर्च आला होता. सदर फुटबॉल मैदानासाठी सभासदांकडून प्रत्येकी ३००० हजार रुपये घेतले होते. मात्र या फुटबॉल ग्राऊंडला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याने हे फुटबॉल ग्राउंड म्हणजे हत्ती पोसण्याचा प्रकार आहे. कारण या मैदानाची मशागत करण्यासाठी क्लबला प्रत्येक महिन्याला साडेतीन लाख ते चार लाख रुपये खर्च येतो. यामध्ये पाणी आणि विजेचा वापर जास्त होतो.

फुटबॉल मैदानाबद्दल विशेष असे की या मैदानाला अजून सिडको आणि महापालिका यांचे ना हरकत प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्यामुळे ना हरकत प्रमाणपत्रासाठी जो दंड आणि व्याज भरावा लागणार आहे ते कोण भरणार याबाबत देखील क्लबच्या सदस्यांमध्ये वाद आहे. तसेच या फुटबॉल मैदानाच्या बाजूला लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या शौचालयालाचे देखील ना हरकत प्रमाणपत्र सिडको व महापालिकेकडे प्रलंबित असून त्याचाही व्याज आणि दंड भरावा लागणार असल्याची माहिती क्लबच्या सदस्यांनी दिली. दरम्यान, एस्ट्रो टर्फ बनवल्यास सकाळी व संध्याकाळी क्लबचे सदस्य, ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुले जे चालण्यासाठी व व्यायाम करण्यासाठी येतात त्यांनाही या टर्फच्या मैदानामुळे अडथळा निर्माण होणार आहे. त्यामुळे नवी मुंबईकर नागरिक आणि क्लबच्या सदस्यांनी एस्ट्रो टर्फ बनविण्याच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. दुसरीकडे नवी मुंबई स्पोर्टस् असोसिएशनची मुख्य इमारत नादुरुस्त झाली आहे.  त्या इमारतीला तडे गेल्याने पावसामध्ये पाणी गळती होत आहे. अनेक वर्षापासून असोसिएशनच्या इमारतीला रंगरंगोटी केलेली दिसत नाही. मुख्य इमारतीमध्ये ज्या निवासी खोल्या करण्यात आल्या आहेत त्यांची ही दुरावस्था झाली आहे. तसेच स्विमिंग पूलची इमारत नादुरुस्त झाली आहे, टेनिस कोर्ट ची संरक्षक भिंत खचली आहे, पार्किंगची दुरावस्था झाली आहे असे असताना एस्ट्रो टर्फ उभारण्याचा घाट का घातला जात आहे, असा संतफ्त सवाल क्लबच्या सदस्यांनी उपस्थित केला आहे.

नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष आमदार गणेश नाईक यांनी नुकतेच मोजक्या चार ते पाच कमिटी सदस्यांच्या उपस्थितीत या कामाचा शुभारंभ केल्यानंतर क्लबच्या सदस्यांना याबाबत माहिती मिळाली. नवी मुंबई स्पोर्ट्स क्लबचे सुमारे आठ हजार सदस्य असून या दोन प्रकल्पांचा शुभारंभ होत असताना कमिटीचे सदस्य पदाधिकारी तसेच हजारो सदस्यांपैकी अन्य कोणाची उपस्थिती नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे नवीन होणा-या एस्ट्रो टर्फ आणि बास्केटबॉल मैदानाला सर्वांचा विरोध असून क्लबच्या १०० सदस्यांनी यासंदर्भात सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांना निवेदन देवून एस्ट्रो टर्फ उभारण्यास परवानगी देऊ नये अशी विनंती केली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाढत्या तापमानामुळे आवश्यक काळजी घेण्याचे महापालिका आयुवतांचे नागरिकांना आवाहन