लाखो श्रीसदस्यांच्या उपस्थितीत डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान

भव्यदिव्य कार्यक्रमात महाराष्ट्र भूषण सन्मानाने आप्पासाहेब धर्माधिकारी सन्मानित 

नवी मुंबई ः राज्य शासनाच्या वतीने ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. दत्तात्रेय ऊर्फ आप्पासाहेब धर्माधिकारी यांना सन २०२२चा महाराष्ट्र भूषण सन्मान केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते देण्यात आला. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि २५ लाख रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. दरम्यान, डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी पुरस्काराची २५ लाख रुपयांची रक्कम त्वरित मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुपूर्द केली.

याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, ‘रायगड'चे पालकमंत्री उदय सामंत, ‘ठाणे'चे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार श्रीरंग बारणे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रशांत ठाकूर, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, ‘डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान'चे डॉ. सचिन धम्रााधिकारी, उमेश धर्माधिकारी, आदि व्यासपीठावर उपस्थित होते.

वीरता, भक्ती आणि सामाजिक चेतना या तीन मार्गांनी देशाला दिशा देण्याचे काम ‘महाराष्ट्र'ने केले आहे. महाराष्ट्र भूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनीही समाजासाठी, दुसऱ्यांसाठी, समाज बांधवांसाठी काम करण्याची शिकवण दिली आहे. या देशाला ‘सर्वे भवन्तु सुखिनः' या मंत्राची आवश्यकता असताना लाखो लोकांची फळी उभी करण्याचे काम आप्पासाहेबांनी केले आहे, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गौरव केला.


कोणत्याही प्रसिध्दीची आस न ठेवता समाज सेवा करणारा एवढा मोठा जनसमुदाय मी आयुष्यात पहिल्यांदा पाहत आहे. या प्रकारचा मान, सन्मान, भक्तीभाव केवळ त्याग, समर्पण आणि सेवेद्वारेच मिळत असते. आप्पासाहेबांप्रती आपले प्रेम, विश्वास आणि सन्मान त्यांच्या संस्काराचा, कर्तृत्वाचा आणि नानासाहेबांच्या शिकवणीचा सन्मान आहे. एकाच परिवारात अनेक वीर जन्मलेले मी पाहिले आहेत. मात्र, समाजसेवेचे संस्कार तीन-तीन पिढ्यांपर्यंत असलेले मी आयुष्यात प्रथमच पाहत आहे. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण सन्मान देऊन त्यांच्यासारखे लाखो लोकांना जीवन जगण्याची प्रेरणा देण्याचे काम केल्याबद्दल राज्य शासनाचे मी अभिनंदन करतो, असेही ना. शहा यांनी यावेळी सांगितले.  

महान छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुण्यभूमीने देशाला तीन मार्ग दाखविले. राष्ट्रासाठी जीवन अर्पण करण्याचा वीरतेचा मार्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरु केला. स्वातंत्र्यवीर सावरकर, चाफेकर बंधू, आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळकांनी स्वराज्य, सन्मानासाठी आपले जीवन अर्पिले. संतपरंपरेचा अध्यात्मिक मार्ग दुसरा मार्ग या भूमीने दिला आहे. समर्थ रामदास, संत तुकाराम महाराजापासून नामदेवांपर्यंत या सर्वांनी महाराष्ट्रातील भक्तीच्या, अध्यात्माच्या मार्गाचे देशाचे नेतृत्व करण्याचे काम केले आहे. सामाजिक चेतनेचा तिसरा मार्गही येथूनच सुरु झाला. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक सामाजिक चेतनेच्या जनकांची महाराष्ट्र भूमी आहे. अशीच सामाजिक चेतना जागृत करण्याचे आणि ती पुढे नेण्याचे काम आज नानासाहेबांनंतर आप्पासाहेब आणि सचिन धर्माधिकारी यांनी सुरु ठेवले आहे. समाजासाठी, दुसऱ्यांसाठी जगण्याची शिकवण देण्याचे काम या भूमीने केले आहे. कर्तृत्वाने दिलेली शिकवण चिरंजीव राहते. समाजासाठी, दुसऱ्यांसाठी, बांधवांसाठी काम करण्याची शिकवण आप्पासाहेबांनी दिली आहे. धर्माधिकारी कुटुंबियांनी आपल्या कर्तृत्वाने समाजामध्ये सुधारणा केली. मुलांसाठी शिक्षण, वृक्षारोपण, स्वच्छता, रक्तदान, जलसिंचन, विहिरींची सफाई, महिला सशक्तीकरण, व्यसनमुक्त समाज अशा विविध क्षेत्रात आप्पासाहेबांनी मोलाचे कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घ्ोऊनच ‘भारत सरकार'ने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले असल्याचेही शहा यांनी यावेळी स्पष्ट केले.

धर्माधिकारी कुटुंबिय राज्यात गेल्या अनेक पिढ्यांपासून लोकांना दिशा देण्याचे काम करत असून ज्ञानाच्या ज्योती घराघरात लावण्यासाठी या परिवाराचे मोठे योगदान आहे. उध्वस्त कुटुंबांना सावरण्याचं काम नानासाहेब, आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केले असून आता सचिनदादा धर्माधिकारी तो वारसा पुढे नेत आहेत. माणसे घडविण्याचे विद्यापीठ म्हणजे रेवदंडा असल्याचे गौरवोद्‌गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी काढले.

आप्पासाहेबांनी माझ्या संपूर्ण कुटुंबाला पुन्हा या समाजाची सेवा करायला मार्गदर्शन केले, दिशा दाखवली आणि म्हणूनच मी तुमच्यासमोर आज मुख्यमंत्री नाही तर एक श्री सदस्य म्हणून उभा आहे. त्यामध्ये आप्पासाहेबांचे मोठे योगदान आहेे. कुटुंब उध्वस्त होत असताना त्यांना वाचवण्याचे, दिशा देण्याचे काम आप्पासाहेबांनी केले. या सोहळ्याला मी श्री सदस्य म्हणून उपस्थित असल्याचे ना. एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

राजकीय सत्तेपेक्षा अध्यात्मिक शक्ती मोठी असते, त्याचे स्वरुप या ठिकाणी उपस्थित राहिलेला जनसागर होेय. राजकीय शक्तीला अध्यात्मिक अधिष्ठानाची जोड, आशीर्वाद आणि प्रेरणा या ठिकाणी लागते. त्याचे जिवंत उदाहरण या ठिकाणी आपण पाहतो आहे. सदर गर्दी सगळे रेकॉर्ड मोडणारी असून याचे रेकॉर्ड मोडायचा असेल तर ते फक्त आणि फक्त आप्पासाहेबांचे श्री सदस्यच मोडू शकतात, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने मनोगत व्यक्त करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जगात सात आश्चर्ये आहेत. मात्र, श्री सदस्यांची अलोट गर्दी जगातील आठवे आश्चर्य आहे. पैशापेक्षाही खरी श्रीमंती काय हे या श्री परिवाराकडे आणि उपस्थित श्रीसदस्यांकडे बघून समजते. निरुपणाच्या माध्यमातून सकारात्मक विचार करण्याची ऊर्जा दिली जाते. मन स्वच्छ करण्याची अद्‌भुत कला आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याकडे आहे. विविध सामाजिक कार्याच्या माध्यमातून धर्माधिकारी कुटुंबीय आणि प्रतिष्ठान करीत असलेले कार्य महान आहे. वृक्षारोपण, स्वच्छता, महिला सशक्तीकरण, व्यसनमुक्ती, रक्तदान अशा अनेक क्षेत्रात त्यांचे उत्तुंग काम आहे. देश-विदेशातही त्यांचे मोठे सामाजिक कार्य आहे, असे ना. फडणवीस यांनी सांगितले.


आप्पासाहेबांच्या निरुपणाचा भक्ती सागर पाहण्याचा योग आज आल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ना. सुधीर मनुगंटीवार यांनी प्रास्ताविकातून सांगितले. तर मन, मानव आणि मानवता असे सूत्र बैठकीत दिले जाते. या विचारातून कार्य सुरु आहे. मनाचे विचार बदलण्यासाठी बैठकीच्या माध्यमातून कार्य केले जाते, असे डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांनी सांगितले.
ना. उदय सामंत यांनी आभार मानले.

 मानवता धर्माचा विचार रुजवायला हवा - डॉ.आप्पासाहेब धमाधिकारी
माझ्या आयुष्यातील आजचा पुरस्कार भाग्याचा क्षण आहे. पुरस्कार नेहमी मोठाच असतो. कार्याची दखल घ्ोऊन पुरस्कार दिल्याने ‘प्रतिष्ठान' कार्याचा गौरव आहे. या सगळ्यांचे श्रेय सर्व श्री सदस्यांना जाते. खेड्यागावातील लोकांना, त्यांच्या रितीरिवाजांना चांगले उत्तम वळण लागायला हवे, यासाठी कामाची सुरुवात केली. महाराष्ट्र भूषण पुरस्कार म्हणजे आपल्या कार्याचा सन्मान आहे. त्यामुळे सदर पुरस्कार सर्वांना समर्पित करत असल्याचे डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.
प्रसिध्दीपासून लांब राहत कार्य सुरू आहे. मानवता धर्म सर्वात श्रेष्ठ आहे, या विचारांची रुजवात अंतकरणात व्हायला हवे. शेवटच्या श्वासापर्यंत आमचे कार्य सुरु ठेवणार असून सचिनदादा कार्य पुढे चालविणार आहेत. कार्य श्रेष्ठ आहे. माणूस नसला तरी ते सुरुच राहणार आहे. देशाचे, आई-वडिलांचे, समाजाचे ऋण फेडण्यासाठी काय सेवा केली, ते प्रत्येकाने ठरविले पाहिजे. त्यासाठी प्रत्यक्ष काम केले पाहिजे. यास्तव नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान उभे केले, असे सांगत डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी प्रत्येकाने किमान पाच पाच झाडे लावायला हवेत. वृक्षारोपण, आरोग्य तपासणी, रक्तदानच्या माध्यमातून समाजसेवा आजपासून प्रत्येकाने सुरु करण्याचे त्यांनी आवाहन व्ोÀले. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिकेतील प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण