सोहळ्याला गालबोट;  ११ श्री सदस्यांचा उष्माघातामुळे मृत्यू

 

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित ११ श्री सदस्यांचा उष्माघातामुळे मृत्यू

नवी मुंबई ः खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित काही श्री सदस्यांना उष्माघातामुळे रुग्णालयात हलवावे लागले. दुर्दैवाने त्यातील अकरा जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. सदरची अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी घटना आहे. राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांचा उपचाराचा खर्च शासनामार्फत केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी रात्री भेट दिली.

मुख्यमंत्र्यांनी उपचार घेत असलेल्या रुग्णांशी संवाद साधला. त्याचबरोबर तेथील डॉक्टर्ससोबत चर्चा करून उपचाराबाबत माहिती घेतली. उष्माघाताचा त्रास झाल्याने श्री सदस्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. सोहळ्याच्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांनी काही श्री सदस्यांवर प्राथमिक उपचार केले. काहींना रुग्णालयात हलवावे लागले. एमजीएम रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या समन्वयासाठी पनवेल महापालिकेचा उपायुक्त दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रुग्ण आणि नातेवाईकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळताच माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, खा. विनायक राऊत, खा. अरविंद सावंत यांच्यासह इतर मान्यवरांनी १६ एप्रिल रोजी रात्री उशिरा एमजीएम हॉस्पिटलला भेट देऊन उपचार घेत असलेल्या श्री सदस्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

मृतांची नावेः महेश नारायण गायकर (४२) वडाळा मुंबई (म्हसळा-मेहंदडी), जयश्री जगन्नाथ पाटील (५४) म्हसळा-रायगड, मंजुषा कृष्णा भोंबंडे (५१) गिरगाव मुंबई (श्रीवर्धन), स्वप्निल सदाशिव केणी (३०) शिरसाटबामन पाडा-विरार, तुळशीराम भाऊ वांगड (५८) जव्हार-पालघर, कलावती सिध्दराम वायचळ (४६) सोलापूर, भीमा कृष्णा साळवी (५८) कळवा-ठाणे, सविता संजय पवार (४२) मुंबई, पुष्पा मदन गायकर (६४) कळवा-ठाणे, वंदना जगन्नाथ पाटील (६२) करंजाड-पनवेल, एक अनोळखी महिला (अंदाजे ५० ते ५५). एकूण ११ मृतदेहांपैकी १० मृतदेह त्यांच्या वारसांच्या ताब्यात देण्यात आले असून एक मृतदेह बेवारस महिलेचा असून वारसाचा शोध चालू आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

लाखो श्रीसदस्यांच्या उपस्थितीत डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान