शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
शुभम वनमाळी हा आशियातील पहिला तर जगातील 10 वा जलतरणपट्टू ठरला
द थोएस्ट थर्टीनमधील 33 किलोमीटरची सागरी मोहिम शुभम वनमाळीने 9 तास 46 मिनिटांमध्ये केली यशस्वी
नवी मुंबई : तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी क्रीडा पुरस्कार आणि शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार विजेता शुभम वनमाळी याने 200 हून अधिक अत्यंत घातक अशा ग्रेट व्हाट शार्क माशांचा वावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन येथील फॉल्स बे या जगातील अतिशय खडतर असलेल्या द थोएस्ट थर्टीनमधील 33 किलोमीटरची सागरी मोहीम 9 तास 46 मिनिटांमध्ये पोहून आपल्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. केप लॉग डिस्टंस स्विमींग असोसिएशनच्या नोंदीनुसार शुभम हा फॉल्स बे पोहणारा आशियातील पहिला आणि जगातील 10 जलतरणपट्टू ठरला आहे.
फॉल्स बे हे अतिशय घातक अशा ग्रेट व्हाइट शार्क चे माहेरघर समजले जाते. या समुद्री भागामध्ये 200 हून अधिक शार्क माशांचा वावर असतो. त्यामुळे येथे जगातील नामवंत जलतरणपट्टू पोहण्याचा विचार करण्यास सुध्दा धजावत नाहीत. त्यामुळे यापूर्वी हे आव्हान जगातील खुप कमी जलतरणपट्टुंनी स्विकारले आहे आणि त्यामधील खुपच कमी जलतरणपट्टुंनी यशस्वी केले आहे.
दरम्यान, 13 एप्रिल 2023 रोजी दक्षिण आफ्रिकी वेळेनुसार सकाळी 6.28 वाजता शुभमने जवळपास 15 सेल्सिअस तापमान असलेल्या थंड पाण्यामध्ये पोहण्यास सुरुवात केली आणि सायंकाळी 4.14 वाजता ही मोहीम यशस्वीपणे पार पाडली. यादरम्यान त्याला थंड पाण्याबरोबरच साथ न देणारे वारे, मोठमोठी लाटा आणि विरुध्द दिशेचा पाण्याचा प्रवाह याचबरोबर असंख्य प्रमाणात असलेल्या ब्ल्यू बॉटल या जगातील घातक समजल्या जाणाऱया जेली फिश इत्यादी आव्हांनाना तोंड द्यावे लागले.
माझ्या संपुर्ण कारकिर्दीतील हि सर्वात रोमांचकारी स्विम आहे. कारण पोहताना प्रत्येक क्षणा क्षणाला वाटणारी शार्कची भीती. परंतु कोणत्याही परिस्थितीत ही मोहीम पार पाडायचीच हा दृढ निश्चय आणि विश्वास यामुळेच मी यशस्वी झालो. प्रत्येक 50 मीटरनंतर कळपामध्ये असंख्य असे ब्ल्यू बॉटल मला दंश करीत हेते. त्यामुळे अंगाची लाही लाही होत होती. पंरतु माझा जेलीफिश दंशाचा अनुभव कामी आला. न थांबता पोहणे हाच यावर उपाय होता. असे शुभम वनमाळी याने हि मोहीम यशस्वीरित्या पुर्ण केल्यानंतर आपले मनोगत व्यक्त केले.
शुभमच्या या यशस्वी मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे. शुभम सध्या पलावा लेक शोअर येथे रुपाली रेपाळे स्विमींग अकॅडमी अंतर्गत जलतरण प्रशिक्षण घेत आहे. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी शुभमबरोबर माजी आंतरराष्ट्रीय सागरी जलतरणपट्टू रुपाली रेपाळे आणि माजी राष्ट्रीय जलतरपट्टू अनिरुध्द महाडिक तसेच त्यांचे वडील धनंजय वनमाळी हजर होते.